Snake Bites : दोन तास विळखा घातलेल्या सापाचा चिमुकलीला दंश, वर्धा जिल्ह्यातील घटना | पुढारी

Snake Bites : दोन तास विळखा घातलेल्या सापाचा चिमुकलीला दंश, वर्धा जिल्ह्यातील घटना

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील बोरखेडी (कला) येथे शुक्रवारी १० सप्टेंबर रोजी मध्यरात्री अंगावर शहारे आणणारी थरारक घटना घडली. तब्बल दोन तास विषारी साप सहा वर्षांच्या चिमुकलीला विळखा घालून बसला. दोन तासांनी विषारी सापाने चिमुकलीच्या हाताला दंश केला (Snake Bites) आणि साप दिसेनासा झाला. चिमुकलीला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बोरखेडी येथील पूर्वा पद्माकर गडकरी (वय ६) ही आईसोबत शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जमिनीवर अंथरुणावर झोपली होती. रात्रीच्या वेळी सापाने घरात प्रवेश केला.

दरम्यान, आईला सापाचा स्पर्श जाणवला. त्यावेळी बघितले असता रात्री १२ वाजताच्या सुमारास विषारी साप चिमुकलीच्या गळ्याला विळखा घालून फणा काढून होता. त्यामुळे आईने तिला स्तब्ध राहण्यास सांगितले.

यावेळी मदतीला अनेकांनी धाव घेतली. पण, सापाने विळखा घातलेला असल्याने कोणताही उपाय चालला नाही. बघ्यांची गर्दी वाढल्यामुळे सापास धोका वाटल्याने तो सुद्धा जागा सोडण्यास तयार नव्हता.

तब्बल दोन तास हा थरार सुरू राहिला. हा प्रकार बघून उपस्थितांच्या अंगावर शहारे आले.

रात्री २ वाजताच्या सुमारास सापाने चिमुकलीच्या गळ्यातून विळखा सोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. परंतु जाताना विषारी सापाने चिमुकलीच्या हाताला दंश केला (Snake Bites) आणि दिसेनासा झाला.

उपस्थित गावकऱ्यांनी चिमुकलीला तातडीने सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले. सध्या चिमुकलीवर सेवाग्राम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Back to top button