दिवाळी ‘आनंदाचा शिधा’ होळीला मिळेल काय? सामान्यांचा पुरवठा अधिका-यांना प्रश्न! | पुढारी

दिवाळी ‘आनंदाचा शिधा’ होळीला मिळेल काय? सामान्यांचा पुरवठा अधिका-यांना प्रश्न!

अकोला; पुढारी वृत्तसेवा : शिंदे व फडणवीस सरकारने सामान्यांची दिवाळी गोड करू अशी घोषणा करीत राज्यातील रेशनकार्डधारकांना दिवाळीनिमित्त खास ‘आनंदाचा शिधा’ वस्तूंचे किट भेट देऊ अशी घोषणा केली होती. मात्र, आनंदाचा शिधा वाटप करण्यात सरकारला अपयश आल्याचे दिसते. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार जिल्हयातील ३ लाख ३२ हजार २७४ लाभार्थ्यांपैकी केवळ चार हजार लाभार्थ्यांनाच शिधा वाटप झाला आहे. त्यामुळे जिल्हयात ८७ टक्के सर्वसामान्य जनता आनंदाच्या शिधापासून वंचित राहिली असल्याचे वास्तव आहे.

एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर सामान्य जनतेची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील महिन्यात आनंदाचा शिधाची घोषणा केली होती. आज रोजी घोषणा करून महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप शिधा पोहचू शकला नाही. त्यामुळे शिधा वाटपाची घोषणा हवेत विरली काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. २१ ऑक्टोबरपासून दिवाळी सणाला सुरुवात झाली.

तरी शिधा अकोल्यात पोहोचू शकली नाही. त्यामुळेच संतप्त शिवसैनिक (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी २० ऑक्टोबरला अन्न धान्य पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. दोन दिवसानंतर जिल्हयात आनंदाचा शिधा पोहोचला पण मोजकाच. त्यामुळे हा शिधा कुणाकुणाला वाटप करावा हा प्रश्न जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पडला आहे.

तेलही नाही अन् रवाही नाही!

आनंदाचा शिधा वाटपात फक्त शंभर रुपयांमध्ये एक लिटर पामतेल, प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चणाडाळ या चार वस्तूंचे किट पिवळे आणि केशरी रेशनकार्ड धारकांना देण्यात येणार आहे. वेळेवर ही किट घरात पोहचू न शकल्याने अनेकांची दिवाळी फराळाविनाच गेली.

दृष्टीक्षेपात संख्या…

  • स्वस्त धान्य दुकानदार – २८
  • लाभार्थी वाटप संख्या – ३९९९
  • एकूण लाभार्थी- ३ लाख ३२,२७४
  • वाटप लाभार्थी टक्केवारीत – १३ टक्के
  • अद्याप बाकी लाभार्थी – ८७ टक्के

अकोला जिल्हयात आनंदाचा शिधा २० तारखेला पोहचला. यादीनुसार २८ स्वस्त धान्य दुकानदारांना शिधाचे वाटप केले. जालना येथील कन्झूमर फेडरेशन सोसायटीमार्फत हे वाटप पूर्ण राज्यात होत आहे. संपूर्ण राज्यात वितरण होत असल्याने कदाचित अडचण जात असावी. एक दोन दिवसात जिल्हयात आनंदाचा शिधा पोहचणार आहे.
– बि.यू.काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.

 

हेही वाचा;

Back to top button