Praniti Shinde : केंद्र सरकारच्या हुकूमशाहीविरोधात ‘भारत जोडो’ यात्रा: प्रणिती शिंदे | पुढारी

Praniti Shinde : केंद्र सरकारच्या हुकूमशाहीविरोधात 'भारत जोडो' यात्रा: प्रणिती शिंदे

अकोला: पुढारी वृत्तसेवा: देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. बेरोजगारी वाढली असून तरूणांच्या हाताला काम नाही. तसेच केंद्र सरकारच्या हुकूमशाही विरोधात काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. लोकांच्या समस्यांकडे शासनाकडून डोळेझाक केली जात असल्याने राहुल गांधी लोकांशी संपर्क साधून त्यांचे मन जाणून घेत असल्याचे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष तथा भारत जोडो यात्रेच्या जिल्हा प्रभारी, आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde)  यांनी सांगितले. यात्रेच्या या भागातील तयारीची पाहणी करण्यासाठी त्या येथे आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

भारत जोडो यात्रेची जिल्हा प्रभारी म्हणून जबाबदारी मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजते, असे सांगून प्रणिती शिंदे (Praniti Shinde)  म्हणाल्या, भारत जोडो यात्रा गौरवशाली यात्रा आहे. अकोला जिल्ह्यातून यात्रा जात असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंदी होणे स्वाभाविक आहे. नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळेल, याबाबत शंका नाही.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशाची एकता, अखंडतेसाठी प्राणाचे बलिदान दिले. त्यामुळे आम्ही या यात्रेसाठी काही वेळ देऊ शकणार नाही का ? सर्वांनी यात्रेत उपस्थित राहावे. सध्या कुठली निवडणूक नाही. तसेच यात्रेचा राजकीय उद्देश देखील नाही. राहुल गांधी हे केवळ देशातील नागरिकांसाठी यात्रेला निघाले आहेत. काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतभेद दूर ठेवून यात्रेत सामील होणे ही काळाची गरज आहे. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अशोक अमानकर, अॅड. महेश गणगणे, अभियंता मनीष मिश्रा उपस्थित होते.

Praniti Shinde : लोकांचा प्रचंड प्रतिसाद

अकोला जिल्ह्यातील नागरिकांचा यात्रेसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. 17 नोव्हेंबरच्या पहाटे 5 वाजता सर्वांना पातूर येथे पोहोचायचे आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दोन दिवस जिल्ह्यात राहील. जिल्ह्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये दौरा केला आहे. प्रत्येक ठिकाणी उत्साह दिसून येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button