

पुढारी ऑनलाईन डेस्क : knife attack in shopping centre : इटलीतील मिलान येथील एका शॉपिंग मॉलमध्ये स्पॅनिश फुटबॉलपटू पोब्लो मारीसह अनेकांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सुपरमार्केटच्या कॅशियरचा मृत्यू झाला आहे, तर फुटबॉलपटूसह अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. इटालियन कायदा अंमलबजावणी एजन्सी कारबिनिएरी (Carabinieri)च्या माहितीनुसार, पोलिसांनी असागोच्या मिलान उपनगरातील एका शॉपिंग मॉलमध्ये 46 वर्षीय इटालियन व्यक्तीला अटक केली आहे. ही व्यक्ती संशयीत असून सदर घटनेचा तपास सुरू आहे, असे सांगितले.
एएनएसए या वृत्तसंस्थेनुसार, एका शॉपिंग मॉल कर्मचाऱ्याचा (कॅशियर) रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. अन्य तीन जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. यात स्पॅनिश फुटबॉलपटू पाब्लो मारी याचाही समावेश आहे. मॉलमध्ये अचानक झालेल्या हल्ल्यामुळे एक व्यक्ती भेदरली होती. त्या व्यक्तीवरही उपचारही करण्यात आले. मात्र, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. आतापर्यंत या हल्ल्यामागचा हेतू समजू शकलेला नाही, असे वृत्तात म्हटले आहे. (knife attack in shopping centre)
बीबीसीच्या बातमीनुसार, शॉपिंग मॉलमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यात मॉलमध्ये कामाला असणा-या 30 वर्षीय कॅशियरचा समावेश होता. पोलिसांनी सांगितले की, ज्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे तो मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. या हल्ल्याचा दहशतवादाशी काहीही संबंध नसल्याचे दिसून येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संशयिताने शॉपिंग मॉलमध्येच एका शेल्फमधून चाकू काढला आणि अचानक लोकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. संशयिताने हल्ला करण्यास सुरुवात करताच मॉलमध्ये एकच गोंधळ उडाला. लोक घाबरून दिसेल त्या मार्गावर धावत बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. (knife attack in shopping centre)
मॉलमधील चाकू हल्ल्यात फुटबॉलपटू पोब्लो मारीला दुखापत झाली आहे. पोब्लो मारीला सेरी ए फुटबॉल लीग क्लब मोन्झाने आर्सेनलकडून लोनवर घेतले. आर्सेनलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याला गंभीर दुखापत झालेली नाही. मॉन्झो क्लबचे सीईओ एड्रियन गॅलियानो यांनी ट्विटर पोस्टमध्ये फुटबॉलपटूला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अॅड्रिन गॅलियानो यांनी सांगितले की, हल्ला झाला तेव्हा फुटबॉलपटू पाब्लो त्याची पत्नी आणि मुलासोबत घटनास्थळी होता. तो मुलाला ट्रॉलीमध्ये बसवत होता तर पत्नी त्याच्या शेजारी चालत होती. सुरुवातीला त्याने लक्ष दिले नाही. अचानक त्याच्या पाठीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. संशयिताने त्याच्या पाठीवर चाकूने वार केले होते.