Devendra Fadnavis : …’हे’ सगळं स्वत:च्या समाधानासाठी चाललंय : देवेंद्र फडणवीस | पुढारी

Devendra Fadnavis : ...'हे' सगळं स्वत:च्या समाधानासाठी चाललंय : देवेंद्र फडणवीस

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्रात सध्या शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये ‘खरी शिवसेना कोण’ यावरुन संघर्ष सुरु असताना निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला.याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांवर झळकत आहे. आयोगाने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद केल्याची ही माहिती समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर नवी माहिती देत भाष्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, निवडणूक आयोगामध्ये अशा प्रकारचं कोणतंही प्रतिज्ञापत्र लागत नाही. एखाद्या पक्षाला मान्यता देणं किंवा चिन्ह देणं याचे नियम ठरलेले आहेत. गेल्या २० वर्षांत वेगवेगळ्या आयुक्तांनी त्यासंदर्भात दिलेले निर्णय प्रमाण आहेत. त्यामुळे कुणाचे प्रतिज्ञापत्र किती आहेत, कुणाचे रद्द झालेत, कुणाचे टिकले हे सगळं स्वत:च्या समाधानासाठी चाललं आहे.

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद झाल्याची माहिती आहे. आयोगासमोर आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी ठाकरे गटाने तब्बल दोन ट्रक भरून ११ लाख प्रतिज्ञापत्रं जमा केली होती. मात्र, ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्राचा फॉरमॅट चुकीचा असल्याने ती बाद ठरवण्यात आल्याची माहिती आहे. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्येच ही प्रतिज्ञापत्रं देणं अपेक्षित होतं. नियम पाळण्यात न आल्यानेच ही प्रतिज्ञापत्रं नाकारण्यात आली आहेत. दरम्यान, उर्वरित साडेआठ लाख प्रतिज्ञापत्रं स्वीकारण्यात आल्याची माहिती समाजमाध्यमांवर फिरत असल्यानं यावर फडणवीस यांनी भाष्य केले.

दरम्यान,  ठाकरे गटाने अलीकडेच दोन ट्रक भरून सदस्यत्वाचे अर्ज आणि प्रतिज्ञापत्रे आयोगाच्या दिल्ली कार्यालयात पाठविली आहेत. शिवसेनेवरील आपला दावा बळकट करण्यासाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे प्राथमिक सदस्यत्वांचे अर्ज आणि प्रतिज्ञापत्रे पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

ठाकरे गटाने आतापर्यंत साडेआठ लाख अर्जांचे गठ्ठे आयोगाकडे पाठविले आहेत. त्यासाठी दोन ट्रकभरून गठ्ठे आयोगाच्या दिल्ली कार्यालयाकडे रवाना करण्यात आले आहेत. ठाकरे गटाने राज्यभरातून सुमारे अकरा लाख अर्ज आणि प्रतिज्ञापत्रे जमा केली आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पक्षाने विहित नमुन्यात अर्ज आणि प्रतिज्ञापत्रे पाठविली आहेत. यात पक्षाची प्रतिनिधी सभा, पदाधिकार्‍यांसोबतच बुथप्रमुखांपासून ते जिल्हा प्रमुखांपर्यंतचे अर्ज आहेत. यांची संख्या जवळपास अडीच लाख असल्याची माहिती ठाकरे गटाचे नेते खा. अनिल देसाई यांनी दिली आहे. आणखी काही जिल्ह्यातून अर्ज, प्रतिज्ञापत्रे आणण्याचे काम सुरू
आहे. तेही आयोगाकडे पाठविले जातील, असेही देसाई यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button