मुंबई : पुढारी वृत्तसेवा राज्यातील महापालिका निवडणुका कधी होतील हे मला सांगता येणार नाही. हे फक्त परमेश्वर आणि न्यायालयलाच ठाऊक, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकांबाबतची अनिश्चितता कायम असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाल्यानंतरही स्थानिक स्वराज्य संस्था, विशेषतः महापलिका निवडणुकीचा संभ्रम कायम आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिवाळीनिमित्त पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यात त्यांनी हे वक्तव्य केले. लोकशाही व्यवस्थेत प्रशासकाने फार काळ संस्था चालवणे योग्य नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था आहे. निवडणुका घेण्याचे अधिकार या संस्थेला आहेत. महापलिका निवडणुकीचा विषय राज्य सरकारकडे प्रलंबित नाही. त्यामुळे महापलिका निवडणुका कधी होतील हे ईश्वर आणि न्यायालयालाच ठाऊक, असे फडणवीस म्हणाले.
राज्य सरकारचे शेतकर्यांकडे नीट लक्ष आहे. शेवटच्या पावसापर्यंत राज्य सरकारने शेतकर्यांना सात हजार कोटी रुपयांची मदत केली. गेल्या चार दिवसांत झालेल्या परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे. आमचे सरकार मदत करणारे आहे. आम्ही घोषणा केल्यानंतर एक महिन्यात शेतकर्यांच्या बँक खात्यात मदत जमा केली. त्यामुळे पंचनामे झाले की परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत दिली जाईल, असेही फडणवीस म्हणाले
वर्षा बंगल्यावरून तुम्ही 'सागर'वर आलात. तुम्हाला 'सागर'वर कसे वाटते? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, वर्षा आणि सागर यामध्ये मला काही फरक वाटत नाही. मी 'सागर'वरही तेवढाच आनंदी आहे. आणि शेवटी वर्षा (पाऊस) सागरालाच येऊन मिळते, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. सरकारमध्ये कोणी आमदार नाराज नाही. सरकार आता पूर्णपणे स्थिरावले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.