बच्चू कडू, रवी राणा यांना सबुरीने घेण्याचा शिंदे-फडणवीसांचा सल्ला

बच्चू कडू, रवी राणा यांना सबुरीने घेण्याचा शिंदे-फडणवीसांचा सल्ला

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू आणि भाजप समर्थक आमदार रवी राणा यांच्यात ऐन दिवाळीत वाद पेटला आहे. या वादात रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गुवाहाटीत खोके
घेतल्याचा आरोप केल्याने कडू यांनी रवी राणा यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या वादाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. दोघांना फोन करून सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे.

आमदार बच्चू कडू यांनी राणा यांच्यावर किराणा सामान वाटपावरून टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू हे खोके घेऊन गुवाहाटीला गेले होते, असा आरोप केला. त्यामुळे कडू चांगलेच संतापले आहेत. त्यांनी राणा यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

शिवसेनेचे 40 आमदार खोके घेऊन फुटल्याचा आरोप करीत असताना सरकारसोबत असलेल्या रवी राणा यांनी खोक्याचा केलेला आरोप केवळ कडू यांच्या जिव्हारी तर लागलाच; पण त्याची दखल मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना
घेणे भाग पडले. या दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुरू केले आहेत. त्यांनी दोघांनाही सबुरीचा सल्ला दिला आहे. दिवाळीनंतर एकत्र बसून वाद मिटवू. आता शांत राहा, असे त्यांनी सांगितले.

बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्या आरोपानंतर आक्रमक पवित्रा घेतला होता. बच्चू कडू एकट्याच्या जीवावर चार वेळा निवडून आला आहे. अपंग बांधवांसाठी 85 शासन निर्णय काढले आहेत. अनाथांना आरक्षण मिळवून दिलं आहे. गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप केला असेल तर त्यांनी सिद्ध करावे, असे आवाहन त्यांनी केले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news