नागपूर: घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक; २७ लाखांची रोकड जप्त | पुढारी

नागपूर: घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक; २७ लाखांची रोकड जप्त

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : कळमना पोलिसांनी हनी कार्तिक अपार्टमेंटमध्ये चोरी करणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून २७ लाख रूपयांची रोकड जप्त केली. मिथिलेश माखनसिंग ठाकूर (वय २२), भूपेश रमेश डोंगरे (वय ४४), आशिष उर्फ डेम्बो भीमराव भैसारे (वय २६) अशी चोरट्यांची नावे आहेत. चोरी केल्यानंतर भूपेश डोंगरे व आशिष भैसारे फरार झाले. तिघांनीही प्लास्टिक बॅगमध्ये भरून रक्कम आपापल्या घरीच ठेवली होती. पोलिसांनी प्रथम माखनसिंगला अटक केल्यानंतर त्याने इतर दोघांची नावे सांगितली. पोलिसांनी भूपेशला डोंगरगाव येथून अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश बळीराम निपाने (वय २५, हनी कार्तिक अपार्टमेंट) व त्यांचा लहान भाऊ पंकज निपाने यांचे कळमना मार्केटमध्ये दुकान आहे. दोघेही भाऊ गुरूवारी (दि.२०) दुकानात बसले होते. तर रत्ना निनावे या त्यांच्या घरी स्वयंपाक करतात. फ्लॅटची एक चावी त्यांच्याकडेही असते. घटनेच्या दिवशी रत्ना निवावे या स्वयंपाक करण्यासाठी फ्लॅटमध्ये गेल्या होत्या. त्यांनी दरवाजा उघडण्यासाठी चावी लावली असता दरवाजा लॉक केलेला नव्हता. निनावे यांना आतमध्ये जाऊन पाहिले असता देवघरातील कपाट उघडे होते व आतील सामान सर्वत्र पसरलेले दिसले. त्यावरून घरात चोरी झाल्याची शंका आल्याने निनावे यांनी दुकानात फोन करून दोघांनाही घरी बोलावून घेतले.

दोघे भाऊ घरी आले असता कपाटात ५५ लाख ५० हजार रूपये नसल्याचे लक्षात आले. त्यांनी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सर्वप्रथम दुकानात काम करणाऱ्यांवर संशय आल्याने त्यांची सखोल विचारपूस केली असता मिथिलेश माखनसिंग ठाकुर याच्यावरील संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखवताच मिथिलेश माखनसिंग ठाकूर याने भूपेश रमेश डोंगरे व आशिष उर्फ डेम्बो भीमराव भैसारे यांच्यासोबत कट रचून चोरी केल्याची कबुली दिली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button