यवतमाळ : संतापजनक! रूग्णालयातून गर्भवतीला बाहेर हाकलले; उघड्यावर झाली प्रसूती | पुढारी

यवतमाळ : संतापजनक! रूग्णालयातून गर्भवतीला बाहेर हाकलले; उघड्यावर झाली प्रसूती

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : प्रसूतीसाठी आलेल्या पत्नीकडे डॉक्टर व परिचारिका लक्ष का देत नाहीत, असा जाब विचारल्याने गर्भवतीला वॉर्डातून हाकलून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शनिवारी सकाळी ही संतापजनक घटना घडली आहे. वॉर्डबाहेर काढल्यानंतर गर्भवतीची उघड्यावर प्रसूती झाली. या प्रकाराबद्दल सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

नेर तालुक्यातील बाळेगाव झोंबाडी येथील प्रतीक्षा सचिन पवार (वय २२) या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्यामुळे त्यांना शुक्रवारी रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी प्रतीक्षाला रक्त देण्याची गरज असल्याचे सांगून तिच्या पतीला खासगी ब्लड बॅंकेतून रक्त आणण्यास सांगितले. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही सचिन पवार याने रक्त आणून दिले. परंतू सकाळपर्यंत डॉक्टर व नर्सेस यांनी प्रतीक्षाची कोणतीही तपासणी केली नव्हती. याबाबत संबंधित डॉक्टरांकडे विचारणा केली असता डॉक्टरांनी सचिन व त्याच्या पत्नीला शिवीगाळ करत वॉर्डामधून बाहेर काढले. तसेच रक्ताची बॅगही त्यांच्या अंगावर भिरकावली, असे सचिन याने सांगितले.

त्यानंतर पत्नीला घेऊन सचिन शासकीय रुग्णालय परिसरातच थांबला. सकाळी साडेआठ वाजता प्रतीक्षाने बाळाला जन्म दिला. उघड्यावर प्रसूती होत असल्याने, परिसरातील नागरिक तिच्या मदतीला धावून आले. मात्र, वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या काळजाला पाझर फुटला नाही. प्रसूतीनंतर ती पतीसह गावी निघून गेली. प्रतीक्षाची ही दुसरी प्रसूती होती. प्रसूती वॉर्डच्या विभाग प्रमुख रजेवर असल्याने हा प्रभार डॉ. रोहिदास चव्हाण यांच्याकडे होता. त्यांनी रुग्णाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. या संतापजनक प्रकारमुळे प्रशासनाबद्दल रोष व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा :

Back to top button