IND vs PAK : अशक्य ते शक्य… करतो विराट; शेवटच्या तीन षटकांत सामना फिरवला | पुढारी

IND vs PAK : अशक्य ते शक्य... करतो विराट; शेवटच्या तीन षटकांत सामना फिरवला

मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर एक लाख प्रेक्षकांच्या समोर खेळला गेलेला भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) हा हाय व्होल्टेज सामना ‘न भूतो न भविष्य’ असाच पहायला मिळाला. विराटने शेवटच्या तीन षटकात सामन्याचा नूरच पालटला. 

18 चेंडू अन् 48 धावांचे आव्हान (IND vs PAK)

शेवटच्या तीन षटकांत सामन्याचा नूर पालटला. भारताला 18 चेेंडूंत 48 धावा करायच्या होत्या.

1. विराट कोहलीने आपला गिअर बदलला. गेल्या विश्वचषकात भारतीयांच्या डोक्यावर मिरे वाटणार्‍या शाहिन शाह आफ्रिदीला विराटने 3 चौकार ठोकून 17 धावा वसूल केल्या. त्यामुळे विजयाचे लक्ष्य 12 चेेंडूंत 31 असे आले.

2. हॉरिस रौफने पहिल्या तीन षटकांत टिच्चून गोलंदाजी केली होती, त्यामुळे 19 वे षटक महत्त्वाचे होते. यात विराटने सलग दोन षटकार मारत हा सामना 6 चेंडूंत 16 धावा असा आणला.

3. शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्या झेलबाद झाला. त्यानंतर कार्तिकने 1 तर विराटने 2 धावा करून सामना 3 चेंडूंत 13 धावा असा आणला.

4. शादाब नवाझने नो बॉल टाकत भारताला विजयाची संधी निर्माण करून दिली. विराटने नो बॉलवर षटकार मारत सामना 3 ला 6 धावा असा आणला.

5. पुढचा चेंडू नवाझने वाईड टाकला त्यामुळे सामना 3 चेंडूंत 5 धावा असा होता. नवाझने विराटला बोल्ड केले मात्र फ्री हिट असल्याने विराट नाबाद राहिला, अन् सामना 2 चेंडूंत 2 धावा असा आला.

6. स्ट्राईकवर असलेल्या दिनेश कार्तिक स्टम्पिंग आऊट झाला. भारताला आता 1 चेंडू आणि 2 धावांची गरज होती. नवाझने वाईड चेंडू टाकल्याने सामना बरोबरीत आला. विजयासाठी 1 धावेची गरज असताना अश्विनने एकेरी धाव घेत विजय साकारला.

विराटच्या टी-20 मध्ये सर्वाधिक धावा; रोहितला टाकले मागे (IND vs PAK)

विराट आंतरराष्ट्रीय टी-20 त सर्वाधिक 3749* धावा करणारा फलंदाज ठरला, त्याने रोहितला (3741) मागे टाकले. दरम्यान हार्दिकनेही टी-20 मध्ये 1000+ धावा व 50+ विकेट्स असा अष्टपैलू विक्रम नोंदवला. टी-20 मध्ये असा विक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला. शाहिद आफ्रिदी, शाकिब अल हसन, ड्वेेन ब्राव्हो, थिसारा परेरा, मोहम्मद हाफिज, मोहम्मद नबी, केव्हिन ओ ब्रायन यांनी हा पराक्रम केला आहे.

* कोहलीचे क्रिकेटचे ज्ञान हे या विजयात पुन्हा ठळकपणे दिसले. शेवटच्या षटकात जेव्हा फ्री हिटच्या चेंडूवर तो बोल्ड झाला तेव्हा चेंडू स्टंम्पला लागून थर्डमॅनकडे गेल्यावर त्याने 3 धावा धावा काढल्या. पाकिस्तानी खेळाडू या धावांबद्दल पंचांशी हुज्जत घालत होते. कारण त्यांच्या मते हा चेंडू डेड झाला होता, पण कोहलीचे ज्ञान पाकिस्तानी खेळाडूंपेक्षा वरचढ ठरले आणि या धावा बाय म्हणून धरल्या गेल्या. त्याचप्रमाणे चेंडू कमरेच्या वर असल्याने पंचांकडे नोबॉलची दाद मागणे आणि पंचांनी ती उचलून धरणे भारताच्या पथ्यावर पडले.

Back to top button