नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत सुनील केदार गटाच्या मुक्ता कोकर्डे अध्यक्षपदी निवडून आल्या. तर कुंदा राऊत या उपाध्यक्षपदी विजयी झाल्या. ही निवड पुढील अडीच वर्षासाठी असेल.
अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या शांता कुमरे, मुक्ता कोकर्डे व देवानंद कोहळे यांची तर उपाध्यक्षपदासाठी सुमित्रा कुंभारे, मनोहर सव्वालाखे यांची नावे चर्चेत होती.
मात्र, उपाध्यक्षपदासाठी कुंदा राऊत यांचे नाव एकमताने ठरवण्यात आले. त्यांचे वडील श्यामदेव राऊत हे जि. प. चे अध्यक्ष होते. सर्व गटांना चालणाऱ्या असल्याने त्यांचे नाव समोर आले. सत्ताधारी काँग्रेसकडे बहुमत असले तरी एक गट नाराज असल्याने पक्षात धाकधूक होती. मात्र, हे बंड वेळीच मोडीत निघाल्याने बंडाळी टळली. अध्यक्षांना ३९, उपाध्यक्षांना ३८ मते मिळाली. तर बंडखोर नाना कंभाले यांनी उभे केलेल्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला १८ तर उपाध्यक्षाला १९ मते मिळाली.
५८ सदस्यीय जिल्हा परिषदेत ३३ सदस्यासह काँग्रेसकडे बहुमत आहे. १४ जागा भाजपकडे, तर ८ जागा राष्ट्रवादीकडे आहेत. काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांच्या गटाचे जि. प. वर वर्चस्व असून सध्या त्यांच्या गटाच्या रश्मी बर्वे या अध्यक्ष होत्या. नवा अध्यक्ष ठरवताना केदार यांची भूमिका निर्णायक ठरली. पहिले अडीच वर्ष अध्यक्षपद केदार गटाला देण्यात आल्याने उर्वरित काळासाठी ते इतरांना द्यावे, अशी काँग्रेसमधील केदार विरोधी गटाची मागणी होती. यातूनच पक्षातील नाना कंभालेंनी वेगळी चूल मांडली. त्यांच्याकडे तीन सदस्य असल्याचा दावा केला जात होता.
मात्र त्यातील दोन सदस्य सोमवारीच तंबूत परतल्याने कंभाले एकाकी पडले. काँग्रेसकडे असलेले ३३ सदस्यांचे संख्याबळ लक्षात घेता नाराज सदस्यांनी वेगळी भूमिका घेतली. तरी याचा काँग्रेसच्या विजयावर परिणामाची शक्यता नव्हती.
दगाफटका होऊ नये, म्हणून काँग्रेसच्या ३२ सदस्यांची व्यवस्था कळमेश्वरमधील एका फार्महाऊसवर करण्यात आली होती. त्यांच्यासोबत शेकापचा एक व राष्ट्रवादीचे दोन सदस्यही होते. सोमवारी निवडणुकीसाठी या सदस्यांना तेथून थेट जिल्हा परिषदेत आणण्यात आले. भाजपकडे संख्याबळ नसतानाही अध्यक्षपदासाठी नीता वलके तर उपाध्यक्षपदासाठी कैलास बरबटे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, नंतर भाजपाने दोघांची उमेदवारी मागे घेतली.
हेही वाचलंत का ?