असा बनला गज्या मारणे शास्त्रीनगरचा भाई ते राज्यातील सेलिब्रिटी गुंड | पुढारी

असा बनला गज्या मारणे शास्त्रीनगरचा भाई ते राज्यातील सेलिब्रिटी गुंड

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कुख्यात गज्या ऊर्फ महाराज ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणे हा मुळशीतील एका छोट्या गावातील तरुण. काही वर्षांपूर्वी गज्या मारणेचे कुटुंब कोथरूड येथील शास्त्रीनगर परिसरात राहण्यास आले. तेथे आल्यानंतर गज्या मारणे गुन्हेगारीकडे वळाला. त्यावेळी गज्याकडून पहिला खून झाला तो पतित पावन संघटनेचे जुने कार्यकर्ते असलेल्या व पुणे शहरात मोठे नाव असलेल्या मिलिंद ढोले यांचा. हा खून वर्चस्व वादातून झाला अन् गुन्हेगारी जगतात गज्याची एंट्री होऊन तो नावारूपाला आला. शास्त्रीनगरचा छोटा भाई ते राज्यातील सामाजिक माध्यमांवरील झळकणारा सेलिब्रिटी गुंड अशी त्याची सध्याची ओळख असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत गज्याचे शहरात आणि जिल्ह्यात किरकोळ गुन्हे सुरूच होते. याच दरम्यान त्याला शहरातील एका राजकीय व्यक्तीचा वरदहस्त लाभला. त्या राजकीय व्यक्तीचा 2004 साली गोळ्या घालून निर्घृण खून झाला. त्या खुनामध्ये मुंबईतील टोळीचा हात होता. त्या वेळी राजकीय व्यक्तीचा विश्वासू साथीदार असलेल्या बबलू कावेडियाचा त्या खुनात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. 2006 साली सारसबाग परिसरातील एका हेल्थक्लबमध्ये कावेडिया आला असताना त्याच्यावर फिल्डिंग लावून गज्या मारणे टोळीने त्याचा खून केल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. यामुळे गज्या आणखीन मोठ्या प्रमाणात नावारूपाला आला. यामध्ये त्याला मोठी आर्थिक रसदही मिळाल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.

ताबेमारी, खंडणी यासारख्या प्रकारातून मुळशीत मारणे टोळीने शिरकाव करून आपले बस्तान बसवले. मिलिंद ढोले आणि बबलू कावेडिया खून प्रकरणात गज्याला न्यायालयाने निर्दोष सोडले. एकेकाळी त्याचा जिवलग मित्र असलेला नीलेश घायवळ त्याच्या घरापासून काही अंतरावर राहण्यास होता. तोदेखील त्या काळात त्याच्या टोळीतील सदस्य होता, परंतु नीलेश आणि घायवळ यांच्यात वर्चस्ववादातून वाद सुरू झाले. दरम्यान, नीलेश हा कोथरूड येथील गांधीभवन परिसरातून जात असताना गज्याच्या आणखी जवळ आलेल्या त्याच्या टोळीतील पप्पू कुडले आणि त्याच्या साथीदारांनी नीलेशवर वार करून त्याच्यावर खुनी हल्ला केला. या खुनी हल्ल्यात नीलेशच्या डोक्यावर घाव होऊनही तो बचावला, परंतु याचा बदला घेण्याचाही प्लॅन नीलेशकडून आखण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिसांकडे असलेल्या नोंदीनुसार, एकेदिवशी पप्पू कुडलेचा भाऊ सचिन कुडले दत्तवाडी परिसरात आला असताना दहशत निर्माण करण्यासाठी सचिन कुडलेवर नीलेशच्या टोळीने अंदाधुंद गोळीबार केला. दांडेकर पुलापर्यंत हा गोळीबार सुरू होता. यात एक गोळी सचिन कुडलेला लागली. त्यामध्ये सचिन कुडलेचा खून झाला. त्यामुळे शहरातील टोळीयुध्द आणखीनच भडकले. यानंतर गज्याची जोरदार राजकीय एंट्री झाली. त्यानंतर नीलेशच्या जवळ असलेल्या गुंड पप्पू गावडेचा जमिनीच्या वादातून गज्या मारणेच्या टोळीने खून केला. तर गुंड अमोल बधेलाही फिल्मीस्टाईलने गाठून वैकुंठ स्मशानभूमीजवळ गोळ्या झाडून गज्या मारणेच्या टोळीने ठार केले.

याच दरम्यान गज्या आणि त्याचा साथीदार बरेच दिवस पोलिसांना गुंगारा देत होते. या दोन्ही खुनाच्या गुन्ह्यात त्याच्यासह त्याच्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई झाली. शेवटी तो मुंबई पोलिसाच्या हाती लागला. तेव्हापासून तो गेली पाच ते सहा वर्षे कारागृहातच होता. या दोन्ही गुन्ह्यात साक्षी-पुराव्यांअभावी त्याची आणि त्याच्या टोळीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. परंतु, कारागृहातून बाहेर येताना काढण्यात आलेली मिरवणूक त्याला भोवली आणि तो पुन्हा पोलिसांच्या रडारवर आला होता. त्यातच नुकत्यात शेअर मार्केटिंग व्यावसायिकाच्या अपहरणामध्ये त्याच्या टोळीचा हात असल्याने त्याला अटक करण्यात आली.

मारणे टोळीवर 23 हून अधिक गुन्हे

शास्त्रीनगरपासून झालेल्या त्याच्या गुन्हेगारीची सुरुवात, त्यात तळोजा कारागृहापासून काढलेली मिरवणूक ही समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरली. तेथून तो राज्यातील सेलिब्रिटी गुंड म्हणून नावारूपाला आल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. एकीकडे मिरवणुकीमुळे शहरातील सर्व गुन्हेगारी टोळ्या पोलिस आयुक्तांच्या रडारवर आल्या. त्यानंतर पुणे शहरात मोक्काचे शतकही झाले. काहींनी एक गजा सबको सजा अशा पध्दतीने बोलूनही दाखविले. अखेर 20 कोटींच्या खंडणीसाठी केलेले अपहरण गज्याला भोवले. यादेखील गुन्ह्यात त्याच्यावर मोक्कानुसार कारवाई होऊन अखेर तो पोलिसांच्या हाती लागला आहे. गज्या मारणे टोळीवर आतापर्यंत 23 हून अधिक गुन्हे दाखल झाले असून त्यातील बर्‍याच गुन्ह्यात निर्दोष मुक्तता झाली तर काही गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. त्याचबरोबर त्याच्यावर 8 वेळा प्रतिबंधात्मक कारवाईदेखील झाली आहे.

 

Back to top button