वाशीम : जिल्ह्यात ६ पैकी ५ पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा | पुढारी

वाशीम : जिल्ह्यात ६ पैकी ५ पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

वाशीम, पुढारी ऑनलाईन डेस्क : जिल्ह्यातील ६ पैकी ५ पंचायत समितीवर महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली आहे. वाशीम जिल्ह्यातील ५ पंचायत समितींवर महिला सभापतींची निवड करण्यात आली आहे. तर मानोरा पंचायत समितीमध्ये भाजपने सत्ता स्थापन केली आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, वाशिम, मंगरुळपिर, मानोरा आणि मालेगाव या ६ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी आज निवडणूक झाली.

५ महिला सभापती …

जिल्ह्यातील ५ पंचायत समितींमध्ये महिला सभापतींची निवड करण्यात आली आहे. कारंजा पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप देशमुख यांनी बिनविरोध तर उपसभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या अलका अंबरकर यांची निवड झाली. रिसोड पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या केशर हाडे तर उपसभापतीपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुवर्णा नरवाडे यांची निवड झाली आहे. वाशिम पंचायत समिती सभापती म्हणून सावित्रीबाई वानखेडे (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) यांची तर उपसभापती पदी काँग्रेसचे गजानन गोटे यांची नियुक्ती झाली आहे.

मंगरुळपीर पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा भगत यांची तर उपसभापती पदी उषा राठोड यांची बिनविरोध निवड झाली आहे. मानोरा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या सुजाता जाधव तर उपसभापती पदी मेघा राठोड यांची निवड झाली असून मालेगाव पंचायत समिती सभापतीपदी कांग्रेसच्या रंजना काळे यांची तर उपसभापती पदी राष्ट्रवादीच्या निर्मला जाधव यांची निवड झाली आहे. आजच्या पंचायत समिती निवडणुकीत मालेगाव आणि रिसोड पंचायत समितीमध्ये सत्तांतर झाले असून मालेगाव व रिसोड पंचायत समित्यांमधील जनविकास आघाडीची सत्ता खेचून महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button