चक्क जीवसृष्टीनेच बिघडवले मंगळावरील पोषक वातावरण | पुढारी

चक्क जीवसृष्टीनेच बिघडवले मंगळावरील पोषक वातावरण

वॉशिंग्टन : एका नव्या संशोधनातून असे दिसून आले आहे की मंगळावरील प्राचीन काळातील सूक्ष्म जीवांनीच या ग्रहाचे वातावरण नष्ट केले असावे. या जीवांनी असे वायू उत्सर्जित केले ज्यामुळे तेथे हवामान बदलाची घटना घडून आली व तेथील जीवसृष्टीला पोषक असलेले वातावरण बदलून गेले.

सुमारे 3.7 अब्ज वर्षांपूर्वी मंगळभूमीवर असे सूक्ष्म जीव होते जे हायड्रोजन शोषून घेत व मिथेन वायू उत्सर्जित करीत. त्या काळात मंगळाचे वातावरणही तत्कालीन पृथ्वीसारखेच होते. मात्र, पृथ्वीवरील वातावरण विकसित होण्यासारखे पर्यावरण आपल्या ग्रहावर निर्माण झाले होते. तशी स्थिती मंगळाबाबत घडली नाही. मंगळावर सूक्ष्म जीवांच्या स्वरूपात जीवसृष्टीला प्रारंभ होताच, या जीवांनी स्वतःच्या मुळावरच येण्यासारखी स्थिती स्वतःच निर्माण केली असावी असे एका क्लायमेट मॉडेलवरून दिसून आले आहे.

याबाबतची माहिती ‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मॉडेलवरून असे दिसून आले की पृथ्वीवरील जीवसृष्टीचा विकास घडण्यामागे व मंगळावरील जीवसृष्टी नष्ट होण्यामागे दोन्ही ग्रहांवरील वायूंची रचना तसेच सूर्यापासूनचे दोन्ही ग्रहांचे अंतर कारणीभूत ठरले.

सूर्यापासून तुलनेने दूर असल्याने मंगळ हा उष्णतेसाठी कार्बन डायऑक्साईड व हायड्रोजनसारख्या उष्णता कोंडून ठेवणार्‍या ‘ग्रीनहाऊस’ वायूंवर अधिक अवलंबून होता. हीच उष्णता तेथील जीवसृष्टीला पोषक होती. मात्र, तेथील सूक्ष्म जीवांनी हायड्रोजन शोषून घेतला आणि मिथेन सोडला. त्यामुळे तेथील उष्णता साठवून ठेवणारी यंत्रणाच ढासळत गेली आणि मंगळ अधिकाधिक थंड होत गेला. त्यामुळे नंतरच्या काळात तिथे जीवसृष्टी विकसित होण्यासारखी स्थिती राहिली नाही. एकेकाळी तेथील तापमान दहा ते वीस अंश सेल्सिअस असे सहन करण्यासारखे होते. मात्र, नंतर ते उणे 57 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले.

Back to top button