Tiger CT-1 : १३ जणांचा बळी घेणारा सीटी-१ वाघ अखेर जेरबंद | पुढारी

Tiger CT-1 : १३ जणांचा बळी घेणारा सीटी-१ वाघ अखेर जेरबंद

गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा ; गेल्‍या वर्षभरात गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील १३ नागरिकांचा बळी घेणाऱ्या  Tiger CT-1 नामक वाघास जेरबंद करण्यात वनविभागाला आज ( दि.१३ ) सकाळी यश आले.

डिसेंबर २०२१ पासून आजतागायत सीटी-१ वाघाने वडसा वनविभागात ६, ब्रम्हपुरी वनविभागात ३ आणि भंडारा वनविभागात ४ नागरिकांना ठार केले होते. शिवाय कित्येक पाळीव जनावरांनाही फस्त केले होते. या वाघाची प्रचंड दहशत असल्याने त्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार वनविभागाने दोन दिवसांपासून ताडोबा व्याघ्र शीघ्र बचाव दल, नवेगाव-नागझिरा व्याघ्र शीघ्र बचाव दल आणि अमरावती व्याघ्र शीघ्र बचाव दलाच्या चमूला पाचारण केले होते.

डॉर्ट मारुन वाघाला बेशुद्ध केले

बुधवारी (ता.१२) सीटी-१ वाघाने देसाईगंजनजीकच्या वळूमाता प्रक्षेत्राजवळ एका गाईला ठार केले होते. त्यामुळे वाघ तेथे येणार, असा अंदाज बांधून वनाधिकाऱ्यांनी त्या भागात एक सावज ठेवले होते. शेजारी शीघ्र बचाव दलाची चमू पाळत ठेवून होती. दरम्यान, आज भल्या सकाळी वाघ तेथे आला. त्यानंतर ताडोबा व्याघ्र शीघ्र बचाव दलाचे प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे, शॉर्प शूटर ए.सी.मराठे, जीवशास्त्रज्ञ राकेश अहुजा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदुकीतून डॉर्ट मारुन वाघाला बेशुद्ध केले. काही वेळाने त्याला जेरबंद करण्यात आले.

गोरेवाडा येथील प्राणीसंग्रहालयात पाठविण्‍याची प्रक्रिया सुरु

जेरबंद करण्‍यात आलेल्‍या वाघाला नागपूरच्या गोरेवाडा येथील प्राणीसंग्रहालयात पाठविण्याबाबत गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक उॉ.किशोर मानकर यांनी वन्यजीव विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याशी चर्चा करुन प्रक्रिया सुरु केली आहे. याप्रसंगी वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर यांच्यासह वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहायक वनसंरक्षक मनोज चव्हाण, धनंजय वायभासे, वनपरिक्षेत्राधिकारी अविनाश मेश्राम, विजय धांडे उपस्थित होते.

हेही वाचा : 

 

 

Back to top button