नागपूरसह विदर्भात मुसळधार : कापूस, सोयाबीनसह संत्र्याचेही मोठे नुकसान | पुढारी

नागपूरसह विदर्भात मुसळधार : कापूस, सोयाबीनसह संत्र्याचेही मोठे नुकसान

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपासून नागपूरसह विदर्भात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीपिकांना बसणार असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पाऊस पडत असल्याची माहिती प्रादेशिक हवामान केंद्राने दिली आहे. मध्य भारतासह विदर्भात येत्या १६ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. परिणामी विदर्भातून परतीचा पाऊस किमान चार ते पाच दिवस लांबणीवर पडला आहे. विदर्भात साधारणत: १५ ते १६ ऑक्‍टोबरपासून परतीच्या पावसाला सुरूवात होते. पण आता किमान २० ऑक्टोबरपासून पाऊस परतीच्या वाटेला लागेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान खात्याने दिली आहे. अलिकडच्या काही वर्षात दिवाळी आणि लक्ष्मी पूजनालाही पाऊस पडल्‍याची उदाहरणे आहेत. ते पाहाता या पावसामुळे दिवाळीतही पाऊस राहाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत लख्ख ऊन होते. दुपारी ४ वाजल्‍यापासून पावसाला सुरूवात झाली. त्या नंतर थांबून-थांबून पाऊस येत राहिला. आज (मंगळवार) पहाटेही पावसाने हजेरी लावली. तर सकाळी ७ वाजल्‍या पासून जोरदार पावसाला सुरूवात झाली. आकाशात काळे ढग भरून आले होते. शहरातील सखल भागात आणि रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहन धारकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी केबल तसेच पाईप टाकण्यासाठी रस्ते खोदून ठेवलेले आहे. या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्‍याने वाहनधारकांमध्ये किरकोळ अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महापालिकेचे खड्डेमुक्त रस्त्यांचे दावे या पावसामुळे फोल ठरले.

या पावसामुळे कापूस, सोयाबीन व संत्र्याचे नुकसान झाले. सोयाबीन कापणीला आलेले आहे. शेंगा भरलेल्या आहे. आता ऊन तापल्यास शेंगा तडकून फुटतात. त्यामुळे दाणा मातीत पडून गुणवत्ता खराब होईल. उत्पादन कमी आणि भावही कमी अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे. बाजारात सोयाबीनला ३५०० रूपये क्विंटल भाव आहे. तर हमीभाव ४,२०० रूपये आहे.

हेही वाचा :  

Back to top button