अमरावती : दुर्गा देवी विसर्जनावेळी पूर्णा नदीत वाहून गेला तरुण | पुढारी

अमरावती : दुर्गा देवी विसर्जनावेळी पूर्णा नदीत वाहून गेला तरुण

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : दुर्गा देवी विसर्जनासाठी विश्रोळी येथील धरणावर गेलेला एक तरुण पूर्णा नदीत वाहून गेला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे बचाव व शोध पथकाने शोध सुरू केले होते. अखेर रविवारी सकाळी त्या तरुणाचा मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले. रामभाऊ मंगल भुसारे (30, रा. विश्रोळी असे मृतकाचे नाव आहे. बचाव पथकाने मृतदेह पाण्याबाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

राम हे शनिवारी दुपारी दुर्गा देवी विसर्जनासाठी विश्रोळी धरणस्थळी गेले होते. यावेळी ते पूर्णा नदीत वाहून गेले. याबाबत स्‍थानिकांनी प्रशासनाला माहिती दिली यानंतर बचाव व शोध पथकाला बोलवण्यात आले. पथकाने धरणापासून नदी पात्रात शोध कार्य सुरू केले. गळ, हुक व बोटीच्या मदतीने तसेच मानवी साखळी करून रामभाऊ यांचा शोध घेण्यात आला. मात्र, त्यांचा शोध लागला नाही.

रविवारी सकाळपासून पुन्हा शोध कार्य सुरू झाले. यावेळी घटनास्थळापासून 7 किलोमिटर अंतरावर रामभाऊ यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह पाण्याबाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पथकातील सचिन धरमकर, दीपक पाल, देवानंद भुजाडे, भूषण वैद्य, गणेश जाधव, योगेश ठाकरे, राजेंद्र शाहाकार, दीपक चिल्लोरकर आदींनी परिश्रम घेतले.

हेही वाचा 

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी 

साहेब! दिवाळी तरी गोड करा; शेतकऱ्याच्या मुलाचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र 

परभणी : गंगाखेड येथे ईद-ए- मिलादुन्नबीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम 

Back to top button