अकोला: पुढारी वृत्तसेवा : अकोल्याच्या आदर्श कॉलनीतील रहिवासी पीयूष पाटील याने तयार केलेल्या गोव्याच्या कदंबा बस मॉडेलची दखल गोवा शासनाने घेतली. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, परिवहन मंत्री मॉविन गुदिन्हो, व्यवस्थापकीय संचालक डेरिक परेरा यांच्या उपस्थिती पीयुषने बनवलेले बसचे मॉडेल त्यांना भेट दिले.
पीयूष कला शाखेचा विद्यार्थी आहे. सध्या तो लरातो वाणिज्य महाविद्यालयात मास्टर ऑफ कॉम्प्यूटर मॅनेजमेंट करीत आहे. तंत्र शाखेशी संबंध नसताना केवळ छंद आणि एसटी बसच्या प्रेमापोटी पीयुषने एसटी बसेसचे मॉडेल तयार करण्यास सुरूवात केली. गेली दोन वर्षे हे काम सुरू आहे. बसचे नवीन मॉडेल आल्यास त्यामध्ये आणखी कोणत्या सुधारणा होऊ शकतात. यावर तो फोकस करतो. आणि ही माहिती सोशल मीडियावर टाकतो.
गोवा राज्यातील बसेसचा अभ्यास करून कदंबा मॉडेल तयार करून त्याची माहिती अपलोड केली. त्याची दखल गोवा सरकारने घेऊन आपला सत्कार केल्याचे पीयूषने सांगितले. 8-10 वर्षे मेडशी-मालेगाव प्रवास करताना एसटीविषयी आवड निर्माण झाली. कदंबा बस ट्रान्सपोर्ट कार्पोरेशनच्या 42 व्या वर्धापन दिनानिमित्त सोहळा साजरा झाला. त्यानिमित्त कदंब बसचे मॉडेल तयार केल्याचे पीयूषने सांगितले.
एसटीचे नवीन मॉडेल आले की, माझी जिज्ञासा वाढते. बसची वैशिष्ट्ये तसेच बारकावे टिपून सुधारणा कशा करू शकतो, हा विचार डोक्यात फिरू लागतो. तसेच मिनी मॉडेल तयार करायला तीन ते साडेतीन हजार रूपये खर्च येतो. तसेच त्यासाठी पंधरा दिवस लागतात. गोव्यासाठी तयार केलेली बस 3 किलो वजनाची होती. ती भेट दिली, असे पीयूष पाटीलने सांगितले. यापुढेही नवनवीन बदल स्वीकारून त्यावर काम करण्याची इच्छा पीयूषने व्यक्त केली आहे.
हेही वाचलंत का ?