मांडवगण फराटा : निवडणुकीवेळीच कारखाना कसा दिसतो : आमदार अशोक पवार | पुढारी

मांडवगण फराटा : निवडणुकीवेळीच कारखाना कसा दिसतो : आमदार अशोक पवार

मांडवगण फराटा; पुढारी वृत्तसेवा: ज्या सभासदांनी कारखान्याला ऊस घातला नाही, त्या सभासदाला कारखान्याच्या निवडणुकीवेळेसच कारखाना दिसतो का? कारखान्याच्या सभासदांची एवढी काळजी होती तर विरोधकांचे सरकार असताना कारखान्याचा वीज निर्मिती प्रकल्पाच्या वीज खरेदीसाठी का पाठपुरावा केला नाही, असा सवाल आमदार अशोक पवार यांनी विरोधकांवर टीका करत केला. नागरगाव (ता. शिरूर) येथे पत्रकारांशी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, वीजनिर्मिती प्रकल्प होऊनदेखील सरकारने त्यावेळी कारखान्याची वीज खरेदी केली नाही. त्यामुळे वीज प्रकल्पासाठी काढलेले कर्जाचे व्याज वाढत गेले, तरीदेखील आपण कुठे डगमगलो नसून वीज निर्मिती प्रकल्पासाठी काढलेल्या कर्जाचा हप्ता भरला आहे. मागील सरकारच्या काळात वीज निर्मिती प्रकल्पाची वीज खरेदी झाली असती तर त्याचा मोठा फायदा शेतकर्‍यांना झाला असता, पण मागील सरकारने वीज खरेदी करार वेळेत केला नाही. त्याचा मोठा फटका बसला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मांडवगण फराटा विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष संतोष फराटे इनामदार म्हणाले की, आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये मोठा विकास झाला आहे. मी आमदार पवार यांच्या विरोधात यापूर्वी काम करत होतो. पण नंतर आपण विकासकामे करणार्‍या नेत्याला विरोध करत असल्याचे माझ्या निदर्शनात आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याबाबत विरोधक सतत आमदार पवार यांच्यावर टीका करत असतात. चांगल्या कामाला कोणी आडवे येईल त्याला आम्ही जशास तसे उत्तर देऊ, अशी टीका फराटे यांनी विरोधकांवर यावेळी केली. नागरगावसारख्या छोट्या गावात माजी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार, आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून कोट्यवधीची विकासकामे झाली आहेत. त्यामुळे सभासदांच्या विश्वासाला कदापि तडा आमदार अशोक पवार यांच्याकडून जाणार नाही, अशी प्रतिक्रिया घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक सुदाम साठे यांनी दिली.

Back to top button