उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानसभा लढवायला उमेदवार राहणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानसभा लढवायला उमेदवार राहणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे

नागपुर; पुढारी वृत्तसेवा : आगामी काळात आपण सर्वजण आश्चर्य चकित व्हाल एवढे पक्षप्रवेश भाजपमध्ये होतील. २०२४ पर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीच लोक शिल्लक राहतील. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानसभा लढवायला उमेदवार राहणार नाही असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलत असताना केला.
शिवसेना अमरावती जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांनी २५ ते ३०  प्रमुख पदाधिकाऱ्यांसह गुरूवारी बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. विभागीय भाजप कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लवकरच संपूर्ण अमरावती लोकसभा, तिवसा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते औपचारिक कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश घेणार आहेत. याशिवाय शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी भाजपच्या संपर्कात आहेत. आगामी काळात प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडणार आहे असे बावनकुळे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते शिंदे गटात आणि काही भाजपमध्ये येत आहेत. २०२४ पर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीच लोक शिल्लक राहतील. येत्या काळात भाजपामध्ये मोठ्या संख्येने पक्षप्रवेश होणार आहे. पुढच्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासह  काँग्रेस, राष्ट्रवादीकडेही विधानसभा लढवायला उमेदवार राहणार नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
मनसे प्रमुख राज ठाकरे पक्ष संघटन बळकट करण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. याबाबत विचारले असता राज ठाकरे यांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे असे ते म्हणाले. भाजप-मनसे युतीचा आता काही विचार नाही.  मात्र जसा काळ पुढे जाईल तसे निर्णय घेऊ असे बावनकुळे यांनी सांगितले.
हेही वाचा

Back to top button