Navneet Rana : अमरावती : नवनीत राणा यांची पोलिसांशी हुज्जत (व्हिडिओ) | पुढारी

Navneet Rana : अमरावती : नवनीत राणा यांची पोलिसांशी हुज्जत (व्हिडिओ)

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.७) आंतरधर्मीय विवाह प्रकरणावरुन पोलिसांना धारेवर धरले. पोलीस फोनला प्रतिसाद देत नसल्याने आक्रमक पवित्रा घेत खासदार राणा यांनी तब्बल एक ते दीड तास गोंधळ घातला. उपायुक्त विक्रम साळी यांच्यासह त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. यामुळे ठाण्यातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते.

Navneet Rana : फोन टॅपिंगचा पोलिसांवर आरोप

धारणी येथील आंतरधर्मीय विवाह प्रकरणाला घेऊन खासदार राणा (Navneet Rana) यांनी पोलिसांसोबत संपर्क साधला होता. मात्र, पोलिसांकडून त्यांच्या फोनला प्रतिसाद देण्यात आला नसल्याची माहिती पुढे आली. शिवाय आंतरधर्मीय लग्नानंतर मुलींना डांबून ठेवल्याचा आरोप मुलींच्या नातेवाईकांनी केला आहे. त्या मुलीला समोर आणा, माझा फोन तुम्ही कोणाच्या सांगण्यावरुन टॅप केला, असे म्हणत खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी काही वेळ पोलीस ठाण्यात ठाण मांडून पोलीसांशी हुज्जत घातली.

अमरावतीत सध्या लव्ह जिहादचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. एका मुलीला पळवून तिचा आंतरधर्मीय विवाह केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर नवनीत राणा यांनी हिंदू संघटनेच्या काही कार्यकर्त्यांसह थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि मुलीला समोर आणण्याची मागणी करत पोलिसांशी हुज्जत घालायला सुरूवात केली. या प्रकारानंतर अमरावतीत आणखी एक आंतरधर्मीय विवाह प्रकरण गाजायला सुरवात झाली आहे.

नवनीत राणा यांनी म्हटले आहे की, पतीने मुलीला डांबून ठेवल्याची तक्रार घेऊन मुलीचे पालक माझ्याकडे आले. मात्र, मी फोन केल्यावर पोलिसांनी माझा फोन रेकॉर्ड केला. तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला. असा सवाल करत त्या राजापेठ पोलीस ठाण्यात धडकल्या. यादरम्यान पोलीस आणि नवनीत राणा यांच्यात वाद निर्माण झाला. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

१९ वर्षांची हिंदू मुलगी आहे. त्या मुलाला पकडून आणले आहे. रात्रीपासून चौकशी करत आहेत, मात्र काही समोर येत नाही. मुलगी कुठे आहे याबाबत उत्तरे दिली जात नाहीयेत. त्या मुलाच्या परिवाराला इथे पकडून आणा, एका तासात सगळे बाहेर येईल. दोन तासांत मुलीचा शोध घ्या, असा अल्टिमेटम त्यांनी दिला आहे. या मुलांचा एक समूह आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button