नागपूर : '५० खोके एकदम ओके' म्हणत निघाला राजकीय भ्रष्टाचाराचा बडग्या; मारबत पाहण्यासाठी लोटली अलोट गर्दी (व्हिडिओ) | पुढारी

नागपूर : '५० खोके एकदम ओके' म्हणत निघाला राजकीय भ्रष्टाचाराचा बडग्या; मारबत पाहण्यासाठी लोटली अलोट गर्दी (व्हिडिओ)

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण महाराष्ट्रात फक्त नागपुरातच निघणारी मारबतीची मिरवणूक आज (सोमवारी) काढण्यात आली. १३७ वर्षांची परंपरा लाभलेली पिवळी आणि १४१ वर्षांची परंपरा असलेली काळी मारबत मिरवणूक नागपुरचे वैशिष्ट्य होती. मारबतीला चालू घडामोडींवर भाष्य करणारे निघणारे बडगे आकर्षणाचे केंद्र होते. छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव मंडळातर्फे ५० खोक्यांवर भाष्य करणारा काढण्यात आलेल्या बडग्याने अनेकांचे लक्ष वेधले.

वाढती महागाई, दुग्धजन्य पदार्थांवर लावलेला जीएसटी, स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारा तसेच फुटीर नेत्यांचा बडगाही आकर्षणाचे केंद्र होता. कोरोनाच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच निघालेली निर्बंधमुक्त मारबत मिरवणूक पाहण्यासाठी अलोट गर्दी लोटली होती. इ. स. १८८० च्या सुमारास राघोजीराजे भोसले (रघुजीराजे नव्हे) ह्यांची कर्तबगार, प्रभावी राजकारणपटू पत्नी बाकाबाई भोसले हिने इंग्रजांशी हातमिळवणी करुन नागपूरकर भोसल्यांची गादी वाचवली. पण तिच्या दगाबाजीने नागपूरचे समाजमन क्षुब्ध झाले. संतप्त नागरिकांनी त्या रात्री बाकाबाईचा पुतळा तयार करून त्याची मिरवणूक काढीत त्याचे विसर्जन केले. या पुतळ्यायालाच ‘मारबत’ हे नाव दिले. या कामात बाकाबाईच्या पतीने तिला साथ दिली म्हणून त्याचाही एक पुतळा तयार केला गेला. त्याला ‘बडग्या ‘ म्हणतात. त्याचेही विसर्जन केले गेले. पुढे बाकाबाई भोसले इंग्रजांना फितूर झाली नसून ती एक राजकीय खेळी असल्याचेही समोर आले. तेव्हापासून पडलेला रिवाज अजूनही कायम आहे.

नागपुरात मारबत उत्सवाला सदाशिवराव ताकितकर यांनी १८८५ मध्ये सुरूवात केली. मूर्तिकार गणपतराव शेंडे यांनी मारबती प्रत्यक्षात साकारल्या आहेत. शेंडे घराण्यातील तिसरी पिढी मारबती तयार करण्याचे काम करीत आहे. काळ्या मारबतीला १४० वर्षांचा, तर पिवळ्या मारबतीला १३७ वर्षांचा इतिहास आहे. ब्रिटिश राजवटीत लोक अत्याचाराने त्रस्त होते. त्यावेळी देश स्वतंत्र व्हावा, या भावनेने १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तऱ्हाणे तेली समाजबांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली होती.

हेही वाचा : 

Back to top button