Nitin Gadkari : अटलजी, अडवाणी, दीनदयाल यांच्यामुळेच मोदींच्या नेतृत्वात भाजपची सत्ता : नितीन गडकरी | पुढारी

Nitin Gadkari : अटलजी, अडवाणी, दीनदयाल यांच्यामुळेच मोदींच्या नेतृत्वात भाजपची सत्ता : नितीन गडकरी

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दीनदयाल उपाध्याय आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी भरपूर कामे केली. त्यानंतर आज नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि अनेक राज्यात भाजपची सत्ता आली, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज (दि. २२) नागपुरात केले. ते नागपुरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात शिक्षक आणि पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते. कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेने त्यांच्या एकलव्य एकल विद्यालयातील शिक्षक आणि पर्यवेक्षकांसाठी चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे.

गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, काही काळापूर्वी पक्षाची स्थिती खूप बिकट होती. मात्र, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दीनदयाल उपाध्याय आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी भरपूर कामे केली. त्यानंतरच आज नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात आणि देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता आली. जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईतील भाजप कार्यालयात गेलो होतो. तेव्हा कार्यालयाची दयनीय अवस्था होती. तेव्हा मावळत्या सूर्याला पाहून अटलबिहारी वाजपेयी यांनी “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा” असे वक्तव्य केले होते. आणि आज त्यांचे वक्तव्य खरे ठरले. कारण जनतेने आम्हाला साथ दिली, असे गडकरी म्हणाले.

जसे कार्य आपण राजकीय क्षेत्रात केले आहे. तसेच कार्य सामाजिक क्षेत्रातही करण्याची गरज आहे. संघ प्रणित एकलव्य एकल विद्यालयातील शिक्षक या नात्याने तुम्ही सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य कराल, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. आपल्या प्रयत्नातून आपण गरिबी, भूकबळी, बेरोजगारीतून आपण मुक्त होऊ. आपण सुशिक्षित आणि सुसंस्कृत बनू. आदर्श समाजाचं एक अंग आपण बनाल. तसेच देशाचे जबाबदार नागरिक बनून कार्य कराल. निश्चितपणे आपण देशाच्या नागरिकांना अभिमान वाटेल, असं काम कराल. आता तो दिवस दूर नाही, लवकरच हा दिवस येईल, असेही नितीन गडकरी म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button