समृद्धी महामार्गाच्या नावातून ‘हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ यांचे नाव वगळले? अजित पवार यांना शंका, म्हणाले… | पुढारी

समृद्धी महामार्गाच्या नावातून 'हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' यांचे नाव वगळले? अजित पवार यांना शंका, म्हणाले...

पुढारी ऑनलाईन: राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारडून एप्रिल 2021 पासून ते सरकार कोसळण्याच्या दिवसापर्यंतच्या सर्व निर्णयांना स्थगिती देण्याचा जोरदार सपाटाच लावला आहे. त्यांच्याकडून काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली, तर काही निर्णय तर रद्दच करण्यात आले आहेत. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे -फडणवीस सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करत खोचक टोलेही लगावले. तसेच घेतलेल्या या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणीही केली. यादरम्यान त्यांनी समृद्धी महार्गाच्या नावातून हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वगळ्याचं जाणवत आहे, त्याबद्दल अर्थमंत्र्यांनी माहिती द्यावी असं देखील म्हटलं आहे.

पुरवणी मागण्यांवर बोलताना विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले की, समृद्धी महामार्गच्या नावातून हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वगळ्याचे जाणवते. यंदाच्या अर्थसंकल्पात आपण एक घोषणा केली होती की, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर ते भंडारा- गोंदिया आणि नागपूर ते गडचिरोली असा विस्तारित करण्याचं नियोजन आहे. रस्त्याचे जवळपास ४७ टक्के काम हे पूर्ण झालं आहे. जालना – नांदेडमधील भूसंपादनासाठी निधीची तरतूद केली जाईल असं सांगितलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, पुरवण्या मागण्यांमध्ये जर आपण वाचलं तर मला समृद्धी महामार्गाच्या नावात बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कुठेच दिसलं नाही. पुरवणी मागण्यांमध्ये एक तरतूद दिसते आहे, त्यामध्ये नागपूर- मुंबई शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग प्रकल्पाकरिता लवचिक समभागापोटी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास भाग भांडवल म्हणून १००० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ही शंका येत आहेत. त्याबद्दल अर्थमंत्री आपण संपूर्ण माहिती देऊ शकता. कारण तमाम हिंदुत्ववादी बांधवाना, शिवसैनिकांना तसेच राज्यातील १३ कोटी जनतेला याची माहिती मिळाली पाहिजे. सर्वांना नक्की काय होतंय हे कळलं पाहिजे असं देखील अजित पवार म्हणाले.

Back to top button