पुणे : शिंदेच शिवसेना पुढे नेताहेत: अमृता फडणवीस यांचे मत | पुढारी

पुणे : शिंदेच शिवसेना पुढे नेताहेत: अमृता फडणवीस यांचे मत

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘शिवसेनेतील घराणेशाही बाजूला ठेवल्यास शिवसेनेचे खरे उत्तरदायित्व एकनाथ शिंदे यांच्याकडेच होते. ते आता शिवसेना पुढे नेण्याचे काम करीत आहेत,’ असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. ‘देवेंद्रजी गॉगल, मास्क आणि हुडी घालून कुणाला भेटायला जायचे, हे माहीत नाही. ते एकनाथ शिंदे यांना भेटायला जात होते, असे मी म्हटलेले नाही.

अजित पवारांना, एकनाथ शिंदेंना की, अशोक चव्हाणांना ते त्यांनाच माहीत होते,’ असेही त्या म्हणाल्या. पहाटेच्या शपथविधीचे नेमके गुपित काय आहे, ते तुम्हाला माहीत आहे का, असे विचारले असता, त्या म्हणाल्या, ‘तो गनिमी कावा होता. पुढे काही आतल्या गोष्टी असतील, तर ते त्यांनाच माहीत. भविष्यात देवेंद्रजी आणि अजित पवार यांची पुस्तके येतील, तेव्हा सर्वांनाच वाचायला मिळेल, कारण देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या जीवनात खूप काही लिहिण्यासारखे आहे,’

‘मुंबईत सत्तांतर आवश्यक’
मुंबई महापालिकेबाबत फडणवीस म्हणाल्या, ‘शिवसेनेच्या पहिल्या गटाचे 25 वर्षे मुंबई महानगरपालिकेवर राज्य राहिले आहे. एवढी वर्षे राज्य असूनही नद्या, समुद्र, रस्ते, वाहतूक आदी विषयांसह आणि विकासात मागे राहिले आहे.’‘ महापालिकेवर सत्तांतर होणे गरजेचे आहे. ते होणार असून, त्यामुळे मुंबईकरांना एक चांगले आयुष्य मिळणार आहे,’ असेही फडणवीस म्हणाल्या.

 

Back to top button