जनतेच्या सेवेसाठीच मी पुन्हा शपथ घेऊन आलो; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन | पुढारी

जनतेच्या सेवेसाठीच मी पुन्हा शपथ घेऊन आलो; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : मी मंत्रीपदाची शपथ घेऊन चंद्रपुरात आलो ते जनतेची सेवा करण्याचा संकल्प करून, मविआ सरकारच्या काळात रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी. आमच्या मनात कोणाविषयी कपटेपणा नाही, असूही नये. आमचा रस्ता सरळ आहे व तो थेट जनतेच्या हृदयापर्यंत जातो, असे प्रतिपादन नवनियुक्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. माझ्या अर्थमंत्रीपदाच्या काळात टाटा ट्रस्टच्या सहकार्याने जे कॅन्सर हॉस्पिटल मंजूर केले होते, त्याचे उदघाटन येत्या २६ जानेवारीला करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रपुरात प्रथमच आगमनानिमित्त भव्य मिरवणुकीद्वारे मुनगंटीवार यांनी शक्तिप्रदर्शन केले. या मिरवणुकीची सांगता गांधी चौकात जाहीर सभेने झाली. याप्रसंगी ते बोलत होते.

Image

ते पुढे म्हणाले, चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली देवस्थान परिसराच्या विकासासाठी २०१९ मध्ये ६० कोटी रु. निधी मंजूर करून जमा केला होता. त्या कामाची निविदा चारच दिवसाआधी प्रकाशित झाली आहे. लवकरच या पवित्र कार्याला सुरुवात होणार आहे. आवास योजनेचा हप्ता प्रलंबित होता, तो देखील तातडीने प्रदान केला जाईल. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान नियमित मिळत नसल्याने, दुर्बल घटक आर्थिक संकटात आहेत, हे अनुदान नियमित मिळण्याची व्यवस्था तातडीने करण्यात येईल.

Image

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. तिरंग्याचा सन्मान करण्यासाठी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी स्वागतार्थ संपूर्ण चंद्रपुर शहर सजले होते. रॅली दरम्यान महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर गांधी चौकात जाहिर सभा पार पडली. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपचे ज्येष्ठ नेते यांची उपस्थिती होती.

हेही वाचा:

 

Back to top button