

अकोला; पुढारी वृत्तसेवा: जिल्हयातील बाळापूर तालुक्यातील व्याळा येथील मानव सिटी पॉलिटेक्निक कॉलेजचे १ ऑगस्टपासून बेपत्ता असलेले चार विद्यार्थी आज (दि.९) मुंबईत पोलिसांना सापडले. या विद्यार्थ्यांना आज (दि. १० रोजी) सकाळी अकोला येथे आणण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. (Akola)
याबाबत सविस्तर महिती अशी की, मानव सिटी पॉलिटेक्निक कॉलेजचे प्रतीक मनोहर तायडे (वय २१, रा. अडगाव बु. ता. तेल्हारा, जि. अकोला), हर्ष विष्णू घाटोळ (वय १८, रा. पळशी खुर्द ता. खामगाव, जि.बुलडाणा), प्रफुल पांडुरंग लंगोटे (वय १९, रा. न्यू भीमनगर, कृषीनगर, अकोला) व एक विद्यार्थीनी असे चौघेजण मागील आठ दिवसापासून बेपत्ता होते. याबाबतची तक्रार बाळापूर आणि सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.
दरम्यान, हे चौघेही मुंबईच्या खेरवाडी झोपडपट्टीमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शोध घेतला असता चौघेही पोलिसांना सापडले. पोलीस उपनिरीक्षक श्रीराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला. चौघांना ताब्यात घेऊन अकोला येथे नेल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे बेपत्ता होण्यामागचे खरे कारण समोर येईल असे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा