भंडारा: पावसाचा कहर सुरूच; घरे कोसळली, अनेक गावांचा संपर्क तुटला | पुढारी

भंडारा: पावसाचा कहर सुरूच; घरे कोसळली, अनेक गावांचा संपर्क तुटला

भंडारा: पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा कहर सुरूच आहे. सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहे. पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद असून गावांचा संपर्क तुटला आहे. घरे कोसळून मोठी हानी झाली आहे.

हवामान खात्याने भंडारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. दोन दिवस विजांच्या चकमकीसह मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. भंडारा शहरातील खात रोडवरील रुक्मिनीनगर व अन्य भागातील घराघरांमध्ये पाणी साचले आहे. रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कारधा-करडी मार्गावरील खमारीजवळील नाल्यावरुन जवळपास १.५ ते २ फूट पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला.

पवनी तालुक्यातील पवनी ते जुनोना, निलज ते काकेपार, तुमसर तालुक्यातील सिलेगाव ते वाहनी, मोहाडी तालुक्यातील आंधळगाव ते पेट, विटगाव ते टांगा, डोंगरगाव ते कानळगाव, अकोला ते वडेगाव, चिचोली ते शिवनी, चिचोली ते नवेगाव, रोहना ते इंदूरखा, महालगाव ते मोरगाव, चाँडेश्वरी लहान पूल, मोहाडी ते मांडेसर, टांगा ते विहीरगांव, उसर्रा ते टाकला हे मार्ग बंद पडले. साकोली तालुक्यातील साकोली ते जांभळी मार्गावरील वडेगाव ते खांबा दरम्यान, पुलावर पाणी आल्याने हा मार्गसुद्धा बंद करण्यात आला.

ज्या पुलावर पाणी आले होते, तिथे पोलिसांचा बंदोबस्त लावून वाहतूक थांबविण्यात आली आहे. याशिवाय तुमसर तालुक्यातील सोरणा गावाच्या बाजूला असलेला तलाव ओव्हरफ्लो वाहू लागला आहे. त्यामुळे नागरिकांना अलर्ट देण्यात आला आहे. पावसाच्या थैमानामुळे जिल्ह्यातील अनेक घरे कोसळल्याने कुटुंब उघड्यावर आली आहेत. पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

शाळांना सुटी जाहीर

भंडारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट घोषित केल्याने जिल्ह्यात मुसळधार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून भंडारा जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा, अंगणवाडी, शिकवणी वर्ग यांना बुधवारी (दि.१०) सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button