यवतमाळ : ३७ मंडळात अतिवृष्टी; दोघांचा मृत्यू, दोनजण बेपत्ता | पुढारी

यवतमाळ : ३७ मंडळात अतिवृष्टी; दोघांचा मृत्यू, दोनजण बेपत्ता

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी हतबल झाला असतानाच सोमवारी पहाटेपासून पावसाने पुन्हा जिल्ह्याला झोडपले. तब्बल ३७ मंडळात अतिवृष्टी झाली असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन जणांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर दोनजण बेपत्ता झाले आहेत. मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती.

मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५५.३ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला.  अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतजमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. रविवारच्या पावसामुळे तब्बल ३५ मंडळांना अतिवृष्टीचा फटका बसला.

दोघांचा मृत्यू, दोघे बेपत्ता

राळेगाव तालुक्यातील खैरी येथील कमलाबाई लक्ष्मणराव टेंभेकर (वय ७२) यांचा वाहून जाऊन मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास गावालगतच्या नाल्यातील बंधाऱ्यात आढळून आला. कळंब शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या चक्रवती नदीमध्ये रविवारी वाहून गेलेल्या इसमाचा सोमवारी दुपारी नदीच्या पात्रात मृतदेह आढळून आला. गणेश संभा काडाम (वय ५५, रा. पोळा मारोती परिसर, कळंब), असे मृताचे नाव आहे. यवतमाळ तालुक्यातील रोहटेक येथील भानुदास श्यामराव चौधरी (वय ५५, रा. रोहटेक) हे पुराच्या पाण्यात वाहून गेले. रविवारी दुपारी ते शेतातून मजुरी करून घरी येत होते. वाघाडी नदीच्या प्रवाहात वाहून गेले. सोमवारी संध्याकाळपर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. बाभूळगाव तालुक्यातील सावर येथे दुचाकीने बोरगाव भिलुक्षा येथे जात असलेला संतोष मेंढे सोमवारी रात्री ८.३० वाजता दुचाकीसह वाहून गेला. त्याच्या सोबत असलेल्या एकाला वाचविण्यात आले.

वाहतूक ठप्प, संपर्क तुटला

वणी तालुक्यात मागील २४ तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. येथे ६१.३० मि.मी. पावसाची नोंद झाली असून, कवडशीसह शिवनी मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. दुसरीकडे पुराच्या पाण्यामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटल्याने ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत. पुसदमध्येही पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, मागील २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २० घरांचे नुकसान झाले आहे. यात यवतमाळ तालुक्यातील ८, झरीजामणीतील ५, दिग्रस ३ आणि आर्णी व राळेगाव तालुक्यातील प्रत्येकी २ घरांचा समावेश आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button