अप्पर वर्धा धरणाचे चौथ्यांदा उघडले १३ दरवाजे, सुटीचे दिवस असल्याने पर्यटकांची रेलचेल | पुढारी

अप्पर वर्धा धरणाचे चौथ्यांदा उघडले १३ दरवाजे, सुटीचे दिवस असल्याने पर्यटकांची रेलचेल

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : मोर्शी येथून अवघ्या आठ किमी अंतरावर असलेल्या अप्पर वर्धा धरणाची शनिवार ६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता चौथ्यांदा तेराही दरवाजे उघडण्यात आले. सर्व तेरा ही दरवाजे ६० सेंटीमीटरने उघडण्यात आले असून त्यामधून १२८९ दलघमी क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. शनिवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे अप्पर वर्धा धरणाची तेराही गेट पुन्हा उघडण्यात आल्याची बातमी पसरताच हे विहंगम दृश्य बघण्यासाठी व पाण्याचे तुषार अंगावर झेलण्यासाठी पर्यटकांनी अप्पर वर्धा धरण परिसरात मोठी गर्दी केली आहे. अप्पर वर्धा धरणाची तेराही गेट उघडण्यात आली असून, नदीच्या पुलाखालून पाणी जात आहे.

 तेराही गेट चारवेळा उघडण्याची पहिलीच वेळ

शुक्रवार ५ ऑगस्टच्या रात्री दहा वाजतापासून पुन्हा शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. पाणलोट क्षेत्रात सुद्धा पाऊस कोसळत असल्याने अप्पर वर्धा धरणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे अप्पर वर्धा धरणाची तेराही दरवाजे  दुपारी १२ वाजता उघडण्याची वेळ आली आहे. जुलै १५ ते ऑगस्ट ५ पर्यंत या वीस दिवसांच्या कालावधीत धरणाची तेराही गेट चारवेळा उघडण्याची वेळ पहिल्यांदाच आली आहे. अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयात मध्यप्रदेशातून वाहत येणार्‍या जाम नदी व माडु नदीला मोठ्या प्रमाणात पूर येऊन दोन्ही नद्या दुथळ्या भरून वाहत आहे.

जलसाठ्यात वाढ

धरणाच्या जलसाठ्यात गत दोन दिवसात प्रचंड वाढ झाली आहे. अप्पर वर्धा धरणात विविध नद्यांचा येणारे पाणी हे १२३० दलघमी क्युसेक आहे. अप्पर वर्धा धरणाची निर्धारित क्षमता 342.50 मीटर एवढी ठेवण्यात आली असली तरी मात्र आजची स्थिती ३४१.७५ अशी आहे. सध्या धरण ८८.२७ टक्के भरले असून शंभर टक्के धरण भरायला केवळ बारा मीटर कमी आहे. मोर्शीच्या उपविभागीय अभियंता मनाली नंदागवळी, मोर्शीचे सहाय्यक अभियंता गजानन साने, सुयोग वानखडे या ठिकाणी तळ ठोकून असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. ३१ जुलै अखेर जलाशयाची पातळी ३४१.१८ निर्धारित केली आहे. ही निर्धारित पातळी जुलै महिन्यातच पूर्ण करण्यात आल्यामुळे अप्पर वर्धा धरणाची तेराही दारे चार वेळा उघडण्याची वेळ पहिल्यांदाच आली आहे. वारंवार कोसळत असलेल्या पाण्यामुळे धरणात येणार्या पाण्याची आवक बघता धरणाच्या खाली येणार्या गावांना पाच दिवसांपूर्वी सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

हेही वाचलंत का?

Back to top button