सत्येंद्र जैन यांच्या पत्नीला न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन | पुढारी

सत्येंद्र जैन यांच्या पत्नीला न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

नवी दिल्ली : पुढारी वृत्‍तसेवा :  हवाला प्रकरणात अडकलेले दिल्‍लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या पत्नी पूनम यांना राऊज अव्हेन्यू न्यायालयाने आज ( दि. ६ ) अटकपूर्व जामीन दिला . हवाला प्रकरणात ईडीने सत्येंद्र जैन यांच्यासोबत त्यांच्या पत्नीवरही आरोप केले होते. काही दिवसांपूर्वी ईडीच्या पथकाने पूनम यांची चौकशी केली होती. दुसरीकडे पूनम यांनी अटक होण्याच्या भीतीने राऊज अव्हेन्यू न्यायालयात अंतरिम जामीन अर्ज दाखल केला होता.

एक लाख रुपयांच्या वैयक्‍तिक जात मुचलक्यावर पूनम जैन यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 ऑगस्ट रोजी होणार आहे. हवाला प्रकरणात सत्येंद्र यांच्या कुटुंबातील वैभव जैन, अंकुश जैन, सुनीलकुमार जैन, अजितकुमार जैन हेही आरोपी आहेत. यातील वैभव आणि अंकुश यांना ईडीने अटक केली आहे.

ईडीकडून जैन यांच्याशी संबंधित ज्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यात अकिंचन डेव्हलपर्स प्रा. लि., प्रयास इन्फोटेक प्रा. लि. आणि जेजे आयडियल कंपनीचा समावेश आहे. ईडीने सत्येंद्र जैन यांना अटक केल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्याकडचे आरोग्य खाते उपमुख्यमंत्री मनिष शिसोदिया यांच्याकडे दिले होते. जैन हे सध्या बिनखात्याचे मंत्री आहेत.

हेही वाचा : 

 

 

Back to top button