सूर्यापासून निघाला विशाल प्लाझ्मा | पुढारी

सूर्यापासून निघाला विशाल प्लाझ्मा

वॉशिंग्टन : खगोल शास्त्रज्ञांनी सूर्याच्या पूर्व भागात एका विशाल प्लाझ्माची निर्मिती पाहिली आहे, जी आजपर्यंत पाहण्यात आलेली नव्हती. या खगोलीय घटनेने संशोधकही चकीत आहेत. सूर्यापासून निघणारा हा प्लाझ्मा लूप इतका मोठा आहे की त्याचे शब्दात वर्णनही करता येणार नाही, असे संशोधकांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या केंटकी राज्यातील खगोलशास्त्रज्ञ रिचर्ड एन. श्रांट्ज यांनी निकोलसविले येथील आपल्या घराच्या परसातूनच ही घटना कॅमेर्‍यात रेकॉर्ड करून घेतली. त्यांनी त्याचे वर्णन निसर्गातील ‘गिनोर्मस’ म्हणजे ‘काही अतिशय मोठे’ अशा स्वरूपात केले आहे. सूर्यापासून निघालेला हा लूप 3,25,000 किलोमीटर लांबीचा होता. हे जवळजवळ सूर्य व चंद्रादरम्यानच्या अंतराइतकेच आहे.

सौर घटनांना ट्रॅक करणारी वेबसाईट ‘स्पेसवेदर डॉट कॉम’ने त्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. या लूपचा उजवा हिस्सा अतिशय वेगवान आणि अस्थिर असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. अर्थात हा प्लाझ्मा पृथ्वीच्या दिशेने येण्याची शक्यता नाही. याचे कारण म्हणजे तो सूर्याच्या दुसर्‍या टोकाला आहे. दरम्यान, सूर्यावर बनलेला सनस्पॉट ‘एआर 3068’ वेगाने वाढत चालला आहे.

Back to top button