Nashik : महामार्गांवर आता डे-नाइट पोलिस गस्त, नाशिकमध्ये पोलिस आयुक्तांचा नवा प्रयोग

 नाशिक पोलिस,www.pudhari.news
नाशिक पोलिस,www.pudhari.news
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातून जाणार्‍या मुंबई-आग्रा महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी मध्यरात्री 12 ते 4 दरम्यान वाहतूक पोलिसांची सुरू करण्यात आलेल्या गस्तीचा प्रयोग यशस्वी झाल्याने आता दुपारी 3 पासूनच विल्होळी ते दहावा मैलदरम्यान पोलिसांची फिरती पथके तैनात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली. त्याचप्रमाणे शहरातील नागरिक तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी शहरातील मार्गांना रंगाची ओळख देण्यासह त्यांचे अंतर मोजण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलिस आयुक्तालयात गुरुवारी (दि.4) सिनिअर जर्नलिस्ट फोरममधील ज्येष्ठ पत्रकार आणि पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्यात शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा झाली. त्यावेळी नाईकनवरे बोलत होते. यावेळी शहरातील दैनिकांचे संपादक, पोलिस उपआयुक्त संजय बारकुंड, पौर्णिमा चौगुले, सहायक पोलिस आयुक्त वसंत मोरे यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ट्रॅफिक इंजिनिअर प्रताप भोसले उपस्थित होते.

नाईकनवरे म्हणाले, शहरात अपघाती मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. विल्होळी ते दहावा मैल या 23 किलोमीटर मार्गावर रात्री 12 ते पहाटे 4 दरम्यान लेन कटिंग अधिक होत असल्याने अपघातांचे प्रमाणही अधिक असल्याचे आढळून आले. महिनाभरापासून या मार्गावर वाहतूक पोलिसांची प्रायोगिक तत्त्वावर गस्त सुरू आहे. पहिल्या लेनमधून हलकी चारचाकी वाहने, तर जड व अवजड वाहने दुसर्‍या व तिसर्‍या लेनमधून ठरावीक वेगाने चालतील, यावर लक्ष केंद्रित केले आहे. हा प्रयोग यशस्वी होत असून, रात्रीच्या अपघातांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे लेन सक्तीची ही अंमलबजावणी 1 ऑगस्टपासून दिवसाही सुरू करण्यात आल्याची माहिती नाईकनवरे यांनी दिली. दुपारी 3 पासून पोलिसांची पथके महामार्गावर गस्त करतात. अवजड वाहने पहिल्या लेनमध्ये येणार नाहीत याची काळजी घेण्यात येत असल्याचे नाईकनवरे यांनी सांगितले.

सात मार्गांना स्वतंत्र रंग
शहरातून बाहेरगावी जाणार्‍या सात मार्गांवर ट्रॅफिक माइलचा प्रयोग प्रस्तावित आहे. त्यात शहरात येणार्‍या व बाहेर जाणार्‍या मार्गांवर स्वतंत्र रंग देण्यात येईल व सीबीएसपासून मोजणी करून नागरिकांना दृश्य स्वरूपात ते कोणत्या ठिकाणी आहेत हे आकड्यांवरून सांगता येईल. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना अवघ्या काही मिनिटांत मदत मिळू शकेल, असे प्रताप भोसले यांनी सांगितले.

सोशल मीडियावरही लक्ष ठेवणार
स्मार्ट सिटीकडे सोशल मीडिया मॉनटरिंग व डेटा अ‍ॅनालिसिस टूलची मागणी करण्यात आल्याची माहिती नाईकनवरे यांनी दिली. सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेवता येईल, त्याचप्रमाणे गुन्हेगारांवरही लक्ष राहील. गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी विशिष्ट ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन नियमित राबवले जात असून, रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरणार्‍यांवर लक्ष केंद्रित केले असून, आवश्यकतेनुसार त्यांच्या पालकांना बोलवून समुपदेशन केले जात असल्याचे नाईकनवरे यांनी सांगितले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news