चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : तलावाच्या वेस्टवेअरमध्ये पोहताना वाहून गेलेल्या मित्राला वाचविण्याच्या नादात दुसऱ्या मित्राचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी चंद्रपूर जवळच्या जुनून तलावावर घडली. नंदलाल कैथवास असे मृत मित्राचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संततधार पावसामुळे जिल्ह्यातील छोटे-मोठे तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. तसेच वेस्टवेअर मधून पाणी बाहेर पडत आहे. 'जुनोना' तलावही ओव्हरफ्लो झाला असून वेस्टवेअरमधून वेगाने पाणी बाहेर पडत आहे.
शुक्रवारी चंद्रपूर जवळच्या जुनोना येथील तिघे मित्र तलावावर गेले होते. तेथे त्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. तिघेजण पोहत असताना एकजण वेस्टवेअर मधील पाण्यातून वाहून गेला आणि लगतच्या झुडपात अडकला. बराच वेळ तो त्या ठिकाणी अडकून असल्यामुळे इतर दोघा मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. वाचविण्याच्या प्रयत्नात नंदलाल कैथवासही वेस्ट वेअर मधून वाहून गेला. यामध्ये नंदलालचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सुरुवातीला वाहून गेलेला आणि झुडपात अडकून असलेल्या मित्राला वाचविण्यात नागरिकांना यश आले. मात्र, त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या मित्राचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
हेही वाचा :