रत्नागिरी : अरे देवा ऽऽऽ आता काय करायचं! मातब्बरांची संधी हुकल्याने डोक्याला हात | पुढारी

रत्नागिरी : अरे देवा ऽऽऽ आता काय करायचं! मातब्बरांची संधी हुकल्याने डोक्याला हात

रत्नागिरी; दीपक कुवळेकर : अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या सोयीचे आरक्षण पडले नाही. तर काही ठिकाणी अनपेक्षित आरक्षण पडल्याने नवख्या उमेदवारांना मिनी मंत्रालयाची संधी चालून आली आहे. मातब्बरांची संधी हुकल्याने डोक्याला हात लावला असून, अरे देवाऽऽऽ आता करायचे काय? असे म्हणण्याची वेळ आली आहे.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे 55 गट होते. राज्य शासनाने यंदा गटांच्या संख्येत वाढ केल्याने 62 गट झाले आहेत. अनुसुचित जाती/जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिलांचे आरक्षण निश्चितीसाठी गुरुवारी जिल्हाधिकार्‍यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली. आरक्षण सोडतीनंतर जिल्ह्यात कहीं खुशी, कहीं गम अशी स्थिती निर्माण झाली आहे. अनेकांची गोची झाली, तर अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलली आहेत.

मंडणगड तालुक्याचा विचार केला तर एकही सर्वसाधारण न पडल्यामुळे अनेक मातब्बरांना धक्का बसला आहे. प्रमोद जाधव, संतोष गोवळे हे विद्यमान सदस्य होते. यापैकी संतोष गोवळे यांना संधी असेल मात्र प्रमोद जाधव यांचा पत्ता कट झाला आहे. दापोली तालुक्यात हर्णै व जालगाव हे दोन सर्वसाधारण पडल्याने या गटाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. जालगावमध्ये माजी समाजकल्याण सभापती चारूता कामतेकर या निवडून आल्या होत्या. आता मात्र त्यांना नवा मतदारसंघ शोधावा लागणार आहे. अनंत करंबेळे, सुनील तोडणकर यांचा पत्ता कट झाला आहे.

खेडमध्ये दयाळ हा एकमेव गट सर्वसाधारण पडला आहे. यामुळे या गटाकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. तर माजी शिक्षण सभापती सुनील मोरे, अरविंद चव्हाण, राजेंद्र आंब्रे, अरूण कदम यांचा पत्ता कट झाला आहे. याठिकाणी आता नव्या इच्छुकांना संधी मिळणार आहे. चिपळूण तालुक्याचा विचार केला तर अलोरे हा एकमेव सर्वसाधारण स्त्री आरक्षित झाला आहे. उर्वरित सर्व गट हे सर्वसाधारण पडले आहेत. यामुळे इच्छुकांना चांगलीच संधी चालून आली आहे. बाळकृष्ण जाधव, विनोद झगडे यांना संधी असणार आहे. गुहागर तालुक्याचा विचार केला तर असगोली हा गट सर्वसाधारण पडला आहे. या गटातून माजी अध्यक्ष विक्रांत जाधव हे उभे राहण्याची शक्यता आहे. तर नेत्रा ठाकूर यांनासुद्धा संधी असणार आहे.

संगमेश्वर तालुक्याची परिस्थिती बदलली आहे. कनकाडी व दाभोळ हे दोनच गट सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहेत. माजी अध्यक्ष रोहन बने व माजी पं. स. सभापती जया माने यांना या गटातून संधी असणार आहे. तर माजी अध्यक्ष रचना महाडिक यांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे. माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे यांचा पत्ता मात्र कट झाला आहे. मुग्धा जागुष्टे यांना मात्र साडवली गटातून संधी असणार आहे. त्याचबरोबर माधवी गीते यांनाही माभळे या गटातून संधी असेल. माजी बालकल्याण सभापती रजनी चिंगळे यांचा पत्ता कट झाला आहे.

रत्नागिरी तालुक्याचा विचार केला तर कुवारबांव व गोळप हे दोनच सर्वसाधारण पडले आहेत. यामुळे गटामध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. माजी उपाध्यक्ष उदय बने, माजी बांधकाम सभापती महेश ऊर्फ बाबू म्हाप यांना मात्र दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे. तर माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांचा पत्ता कट होणार आहे. लांजा तालुक्यात भांबेड व साटवली हे दोन गट सर्वसाधारण पडले आहेत. यामुळे येथे चुरस पाहायला मिळणार आहे. माजी अध्यक्ष स्वरूपा साळवी यांचा मात्र पत्ता कट झाला आहे. चंद्रकांत मणचेकर यांना संधी असणार आहे. राजापूर तालुक्यात केळवली, कशेळी, जुवाठी हे सर्वसाधारण पडले आहेत. माजी शिक्षण सभापती दीपक नागले यांना संधी असणार आहे तर गोपाळ आडिवरेकर यांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे.

Back to top button