मला राजकारण सोडावेसे वाटते; नितीन गडकरींच्या उद्गिग्न वक्तव्याची चर्चा | पुढारी

मला राजकारण सोडावेसे वाटते; नितीन गडकरींच्या उद्गिग्न वक्तव्याची चर्चा

नागपूर; पुढारी ऑनलाईन : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union road transport and highways minister Nitin Gadkari) यांनी सध्याच्या राजकारणाबाबत एक महत्वाचे वक्तव्य केले आहे. ”मला कधीकधी राजकारण सोडावेसे वाटते. कारण समाजासाठी इतर अनेक गोष्टी आहेत ज्या करणे गरजेच्या आहेत. आजकालचे राजकारण हे सामाजिक परिवर्तन आणि विकासाचे साधन बनण्याऐवजी सत्तेत राहण्याकडेच जास्त झाले आहे.” अशी भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांच्या सत्कार कार्यक्रमात गडकरी बोलत होते. गांधी याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. पण २०१४ मध्ये ते राष्ट्रवादीतून बाहेर पडले. त्यांच्या सत्कार कार्यक्रमात गडकरींनी केलेल्या वक्तव्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

राजकारण म्हणजे काय आहे हे समजून घ्यायला हवे. हे समाजाच्या, देशाच्या कल्याणासाठी आहे की सरकारमध्ये राहण्यासाठी? असा प्रश्न उपस्थित करत महात्मा गांधींच्या काळापासून राजकारण हे सामाजिक चळवळीचा एक भाग आहे. पण नंतर ते राष्ट्र आणि विकासाच्या लक्ष्यांवर केंद्रित झाल्याचे गडकरींनी म्हटले आहे.

पुढे त्यांनी म्हटले आहे की आज आपण (राजकारणात) जे पाहत आहोत ते १०० टक्के सत्तेवर येण्यासाठी चालले आहे. राजकारण हे सामाजिक, आर्थिक सुधारणेचे खरे साधन आहे. म्हणूनच आजच्या राजकारण्यांनी समाजात शिक्षण, कला आदींच्या विकासासाठी काम केले पाहिजे.

“गिरीश भाऊ जेव्हा राजकारणात होते तेव्हा मी त्यांना परावृत्त करायचो. कारण कधीकधी मी राजकारण सोडण्याचा विचार करतो. राजकारणाव्यतिरिक्त जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या करणे आवश्यक आहेत,” असे गडकरी म्हणाले.

गडकरींनी यावेळी समाजवादी आणि राजकीय नेते जॉर्ज फर्नांडिस यांची आठवण काढत त्यांच्या साध्या राहणीबद्दल त्यांचे कौतुक केले. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो. कारण त्यांनी कधीच सत्तेची पर्वा केली नाही. ते प्रेरणादायी जीवन जगले. लोक माझ्यासाठी मोठे पुष्पगुच्छ आणतात अथवा माझे पोस्टर लावतात तेव्हा मला त्याचा राग येतो, असेही गडकरी यांनी नमूद केले.

 हे ही वाचा :

Back to top button