

उमर खेड; पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे पैनगंगेला पूर आला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत थर्माकोलची होडी (Thermocol Boat) करून नवरदेवाने पूर पार केला आणि लग्नमंडपात हजेरी लावली.
हदगाव तालुक्यातील करोडी येथील शहाजी माधव राकडे या युवकाचे लग्न शुक्रवारी सकाळी उमरखेड तालुक्यातील संगम चिंचोली येथे गायत्री बालाजी गोंडाडे यांच्याशी ठरले होते. रस्ते वाहतूक बंद होती तसेच नदीला पाणी आले होते. त्यामुळे लग्नाला कसे जावे, असा प्रश्?न समोर उभा राहिला. ऐनवेळी वधूकडील मंडळींची तारांबळ होऊ नये म्हणून वर व काही नातेवाईकांनी गुरुवारी दुपारी पुरातून जाण्याचे ठरविले. त्यासाठी चक्क थर्माकोलच्या होडीचा (Thermocol Boat) वापर करण्यात आला. त्याआधारे सर्वजण जलमय मार्गाने प्रवास करीत संगम चिंचोली येथे लग्नस्थळी पोहोचले.
रात्री साखरपुडा व अन्य कार्यक्रम उत्साहात पार पडले. शहाजीच्या घरात आई, वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. वधूही नात्यातीलच असल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी दुपारच्या सुमारास विवाह पार पडला.