गडचिरोली : पावसाची विश्रांती, पण सिरोंचाला पुराचा वेढा, अजूनही २१ मार्ग बंद | पुढारी

गडचिरोली : पावसाची विश्रांती, पण सिरोंचाला पुराचा वेढा, अजूनही २१ मार्ग बंद

गडचिरोली, पुढारी वृत्‍तसेवा : गेल्‍या सहा दिवसांपासून जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने आज विश्रांती घेतली. मात्र अजूनही पूर परिस्थिती कायम असल्याने २१ प्रमुख मार्ग बंद केले आहे. तर शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. सिरोंचा-कालेश्वर (तेलंगणा) हा राष्ट्रीय महामार्ग पुरामुळे खचला आहे. आतापर्यंत पूरबाधित ४९ गावांतील २७८५ कुटुंबातील ११ हजार ८३६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. गडचिरोली-नागपूर,आलापल्ली-भामरागड आणि गडचिरोली-चामोर्शी या मार्गांवरील वाहतूक सुरू झाली आहे.

पुरामुळे आष्टी-आलापल्ली, आष्टी-चंद्रपूर यासह २१ मार्ग बंद आहेत. अहेरी, सिरोंचा, भामरागड, इत्यादी तालुक्यांमधील काही अंतर्गत रस्त्यांचे दळणवळणही बंद झाले आहे. मात्र,गडचिरोलीनजीकच्या पाल नदीचा पूर ओसरल्याने गडचिरोली-नागपूर, शिवणी नाल्यावरील पाणी कमी झाल्याने गडचिरोली-चामोर्शी आणि पर्लकोटा नदीचा पूर ओसरल्याने आलापल्ली-भामरागड हे मार्ग सुरू झाले आहेत.
पुराचा सर्वाधिक फटका सिरोंचा तालुक्याला बसला आहे. अतिवृष्टी तसेच मेडिगड्डा बॅरेजमधून मोठा विसर्ग होत असल्याने प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांना पूर आला असून सिरोंचा तालुक्यातील नागरिकांचे जीणे मुश्किल झाले आहे.

आतापर्यंत पूरप्रवण ४९ गावांतील २७८५ कुटुंबांतील ११ हजार ८३६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. यात प्रामुख्याने सिरोंचा आणि अहेरी तालुक्यातील नागरिकांचा समावेश आहे, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.अहेरी तालुक्यातील १३ गावातील २९२ कुटुंबातील ९९२ नागरिकांना, तर सिरोंचा तालुक्यातील ३४ गावातील २४२४ कुटुंबातील १० हजार ५७३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

दरम्यान, गोसेखुर्द धरणातून होणारा विसर्ग वाढला आहे. सध्या ३३ पैकी २७ दरवाजे एक मीटरने तर ६ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून २.३० लाख क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. तेलंगणा राज्यामधील मेडिगड्डा धरणाचे सर्व ८५ दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून २८.६० लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दोन्ही ठिकाणच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा

Back to top button