बुलढाणा : नाही, नाही म्हणणारे संजय गायकवाड लोकसभेसाठी ‘हो’ म्हणतील ?

बुलढाणा राजकरण
बुलढाणा राजकरण
Published on
Updated on

बुलढाणा; विजय देशमुख : अलिकडेच शिंदे गटाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने मिश्किलपणे विचारले होते, "भाऊ, भविष्यात लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार आहे का? यावर गायकवाड यांनी तत्परतेने उत्तर दिले होते,"पॉलिशीच अशी आहे की, पक्षाचा सिटींग आमदारच ती जागा लढवेल. अर्थात मी विधानसभा लढणार, लोकसभेचा प्रश्नच येत नाही. अडीच वर्षांपूर्वीच आमदार झालेल्या गायकवाड यांना एवढ्या लवकर लोकसभेत जाण्याचा विचारही शिवला नसणार! त्यामुळे एखादा झुरळ झटकावा इतक्या तत्परतेने त्यांनी उत्तर दिले होते. पण आता तोच प्रश्न पुन्हा प्रकर्षाने समोर येण्याचे दिसत आहे. शिवसेनेचा शिंदे गट व भाजप युतीकडून आमदार गायकवाड यांना पुढील लोकसभा निवडणूक लढवावी लागेल का? याचे संकेत तर मिळत नाहीत ना ? असा प्रश्न केला जात आहे.

ठाकरे व शिंदे गटातील दुहीचे राजकारण वेगात दिसत आहे. शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर आता असंतुष्ट खासदारांचीही मोट बांधण्याच्या हालचाली दिसत आहेत. शिंदे गट व भाजपाच्या नव्या सरकारचे मंत्रिमंडळ लवकरच आकाराला येईल. या मंत्रिमंडळाची बांधणी ही विशेषत्वाने लोकसभा निवडणुकीत मोदींचे हात बळकट करण्याचे दृष्टीने असेल, असे बोलले जात आहे.

या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणावर बोलू या काही..!

शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांची खासदारकीची ही तिसरी टर्म आहे. एकनाथ शिंदेंसोबतच्या बंडातील शिवसेना आमदारांमध्ये बुलढाण्याचे संजय गायकवाड (बुलढाणा) व संजय रायमुलकर (मेहकर) हे दोन आमदार सहभागी झाले होते. हे दोघेही खासदार जाधव यांचे समर्थक समजले जातात. 'त्या' रात्री सुरतला पोहचल्यावर आमदार रायमुलकरांनी खासदार जाधवांना फोन करून बंडाबाबत सांगितले होते व आता काय करू? असे विचारले होते. त्यावर जाधवांनी आत्ता विचारता का? असे उलट सुनावले होते. त्यानंतर रायमूलकर व गायकवाड दोघेही 'नॉट रिचेबल'होते. चालक कामावर न आल्यामुळे मी शेतात स्वतः ट्रॅक्टर चालवीत यंत्राने पेरणी करीत आहे. असे स्वतःचे फोटोच जाधवांनी सोशल मिडियावर टाकले होते आणि आपण दोन्ही आमदारांच्या संपर्कात नसल्याचे त्यावेळी सांगितले होते. सुरूवातीला हे कुणाला पटण्यासारखे नव्हते. पण बंडाचे परस्पर साहस करण्यापूर्वी साधे विचारलेही नव्हते. या प्रकाराने खा. जाधव चक्रावून गेले होते.

दरम्यान, ठाकरे-शिंदे यांच्यातील वादानंतर बुलढाण्याचे शिवसेना खासदार जाधवांच्या भूमिकेकडे पाहिले जावू लागले आहे. सध्या तरी ते गोंधळात पडलेले दिसतात. आपले समर्थक दोन आमदार धाडस करून पुढे गेले आहेत. आपलीही भूमिका त्यांना अनुकूल ठरली. तर भविष्यात आपल्यासाठीही ते फायद्याचे राहील. असे काही प्रयत्न झाल्याचे समोर आले असते तर जाधवांची '..मूठ सव्वा लाखाची' नव्हे तर 'वज्रमूठ' ठरली असती. संधी चुकवल्याबाबत नेपोलिअनचे उदाहरण सांगितले जाते. त्याने युद्धात घोड्याला एक टाच मारायला उशीर केला होता. खा.जाधवांनी काहीशी उघड भूमिका घेतली असती तर पुढे चौथ्या वेळची लोकसभा लढण्यासाठीची ती 'पेरणी' ठरली असती कदाचित. पण त्यांच्या मनात काय चालले आहे? त्यांचे समर्थकही कोड्यात पडले आहेत!

अर्थात राजकारणात कुणी काय भूमिका घ्यावी? हा व्यक्ती स्वातंत्र्याचा विषय आहेच. मेहकरचे शिंदे गटाचे आ.संजय रायमूलकर यांना ज्येष्ठतेनुसार यावेळी मंत्रिमंडळात संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. अशावेळी त्यांचे गॉडफादर खा.जाधव यांचा कल शिंदे गटाकडे झुकलेला दिसणे अपेक्षित होते. अडीच वर्षापूर्वी खा. जाधवांनीच रायमूलकरांच्या मंत्रिपदासाठी 'लॉबींग'चा पूल बांधला होता. आता पूलाखालून पाणी वाहिले आहे का? खा.जाधव यांची अलिकडील अस्पष्ट भूमिका ही रायमूलकरांच्या (संभाव्य)मंत्रिपदाच्या संधीला बाधक ठरेल का ?

लोकसभेचं काय?

राज्यात पुढील लोकसभेची निवडणूक शिंदे गट व भाजपा संयुक्तपणे लढतील, असे दिसत आहे. मोदींचे हात बळकट करण्यासाठी भाजप राज्यातून मिशन ४५ च्या माध्यमातून आपला वरचष्मा ठेवेल. अशावेळी एका-एका सीटसाठी सखोल विचार होईल, हे लक्षात घेता बुलढाणा जिल्ह्यात काय स्थिती असेल? भाजपा-शिंदे गटाचा उमेदवार कसा ठरेल? लोकसभा निवडणुकीस अद्याप दोन-सव्वा दोन वर्षाचा अवधी आहे, असे कुणालाही वाटेल. पण भाजपला २०२२ दूर वाटत नसावे.

बुलढाण्याचे लोकसभा सीट सद्या शिवसेनेकडे आहे. येत्या काळात शिवसेनेत होणा-या घडामोडीवर इथल्या सीटचे भवितव्य ठरेल. भविष्यात भाजप -शिंदे गटाचा उमेदवार ठरवताना भाजपचा कौल महत्वाचा राहील. ६ विधानसभा मतदारसंघांच्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ३ आमदार भाजपचे, २ शिंदे गटाच्या शिवसेनेचे तर राष्ट्रवादीचे १ आमदार आहेत. भाजप उमेदवार निवडीबाबत सजग राहील. यावेळी लोकसभेला तरूण तडफदार उमेदवार द्यावा. असा मुद्दा भाजपने शिंदे गटाकडे रेटल्यास शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचे नाव समोर येऊ शकते. त्या अनुषंगाने नव्या मंत्रिमंडळाच्या रचनेत कोणते सूत्र समोर ठेवले जाऊ शकते? घोडा मैदान समोर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news