पुणे: डच गुलाबांनी गुरुला वंदना, दोन लाख गुलाब बाजारात; 20 फुलांच्या गड्डीस 60 ते 150 रुपये भाव | पुढारी

पुणे: डच गुलाबांनी गुरुला वंदना, दोन लाख गुलाब बाजारात; 20 फुलांच्या गड्डीस 60 ते 150 रुपये भाव

पुणे : यंदा डच गुलाबांनी गुरुवंदना होणार आहे. कारण गुरूपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात मागील दोन दिवसांत तब्बल दोन लाख डच गुलाबांची आवक झाली. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने त्यांना मागणीही चांगली राहिली. आवकच्या तुलनेत मागणी मोठी राहिल्याने घाऊक बाजारात 20 फुलांच्या गड्डीस 60 ते 150 रुपये भाव मिळाला. गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुरूंना पुष्प तसेच पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे मागील दोन वर्षांत गुरूपौर्णिमेच्या दिवशी डच गुलाबांना मागणी नव्हती.

मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन शाळा, महाविद्यालये, शिकवणीही सुरू झाल्या आहेत. परिणामी, बाजारात डच गुलाबांना चांगली मागणी आहे. त्यापार्श्वभूमीवर मागील तीन दिवसांपासून मार्केट यार्डात दररोज सरासरी चार हजारांहून अधिक गड्ड्यांची आवक होत आहे. घाऊक बाजारात 20 फुलांच्या गड्डीस मंगळवारी (दि. 12) 60 ते 150 रुपये भाव मिळाला. तर, किरकोळ बाजारात एका फुलाची 20 ते 30 रुपयांना विक्री झाली.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात खेड शिवापूर, शिक्रापूर, मावळ, तळेगाव (दाभाडे) येथून फुलांची आवक होत असते. गुरूपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बाजारात दररोज पाच हजारांच्या आसपास डच गुलाब तर साडे सात ते आठ हजारांच्या आसपास साध्या गुलाबांची आवक झाली. शाळा व महाविद्यालय सुरू झाल्यानंतर यंदा शेतकर्‍यांनी गुलाबाच्या लागवडीत वाढ केली. मागील वर्षी गुलाबाच्या गड्डीला 40 ते 60 रुपये दर मिळाला होता. यंदा त्यामध्ये दुपटीने वाढ होऊन दर 60 ते 150 रुपयांवर गेल्याचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.

Back to top button