गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; १६ जुलैपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद!

File Photo
File Photo

गडचिरोली, पुढारी वृत्‍तसेवा : गेल्‍या ३ दिवसांपासून  जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी १६ जुलैपर्यंत शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी १० जुलैला आदेश जारी  केले आहेत. दि. १३ जुलैपर्यंत सर्व शाळा, महाविद्यालये आणि खासगी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जारी केले होते. त्यानंतर सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक नद्यांना पूर आला असून, कित्येक मार्ग बंद आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी नवा आदेश जारी करुन शाळा, महाविद्यालये आणि खासगी आस्थापना १६ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आज संध्याकाळी जारी केले आहेत.

शेकडो गावांचा संपर्क तुटला, १८ गावांतील १७७ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले

गेल्‍या तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस पडत असल्याने १५ हून अधिक प्रमुख मार्ग बंद असून, शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. आतापर्यंत पूरबाधित १८ गावांतील १७७ कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

काल(ता.१२) संध्याकाळपासून भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड-आलापल्ली मार्ग बंद असून, त्या परिसरातील सुमारे शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. सिरोंचा तालुक्यातील काही गावांमधील रपटे वाहून गेल्याने १५ गावांचे दळणवळण बंद झाले आहे. गडचिरोली तालुक्यातील काही रस्ते पुरामुळे बंद आहेत. आतापर्यंत पूरप्रवण १८ गावांतील १७७ कुटुंबांतील २१०७ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. यात प्रामुख्याने अहेरी आणि सिरोंचा तालुक्यातील नागरिकांचा समावेश आहे, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

प्राणहिता, गोदावरी आणि इंद्रावती या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news