अनधिकृत बांधकामांवर हातोडा; शिवणे दांगट इस्टेट परिसरात कारवाई | पुढारी

अनधिकृत बांधकामांवर हातोडा; शिवणे दांगट इस्टेट परिसरात कारवाई

वारजे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेने नवीन (जॉ कटर) मशिन खरेदी केल्यानंतर गुरुवारी पहिल्यांदाच शिवणे दांगट इस्टेट परिसरातील सर्व्हे क्रमांक 82, लेन नंबर एकमध्ये नवीन जॉ कटर पोकलेन मशिनच्या साहाय्याने मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत बांधकामे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. शिवणे दांगट इस्टेट परिसरातील या पाच मजली अनधिकृत इमारतीवर पालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून कारवाई करण्यात आली. यामध्ये पाच मजली इमारतीचा अर्धवट भाग (जॉ कटर) खेकडा पोकलेन मशिनच्या साहाय्याने पाडण्यात आला. साधारणपणे 20 हजार चौरस फुटांचे क्षेत्र कारवाईत मोकळे करण्यात आले.

या वेळी बिल्डर व स्थानिकांकडून कारवाईस विरोध केल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या विरोधास न जुमानता बांधकाम विकास विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. सदरील कारवाई बांधकाम विकास विभाग झोन 3 चे कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे, उपअभियंता देवेंद्र पात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता सचिन जावळकर, सतीश शिंदे, अजित ववले, संदेश कुळवमोडे यांनी दोन जेसीबी, एक मेकॅनिकल माउंटेड जॉ कटर मशिन, दोन ब्रेकर, अतिक्रमणचे 10 कर्मचारी तसेच स्थानिक पोलिसांसह बंदोबस्तातील एकूण 40 पोलिस यांच्या मदतीने केली. शिवणे, उत्तमनगर, वारजे माळवाडी, गणपती माथा, न्यू अहिरेगाव परिसरासह झोन 3 मधील सर्वत्र ठिकाणी आठवड्यातून दोनदा सातत्याने अशीच कारवाई करणार असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

Back to top button