असा एक लग्नसोहळा : कन्यादान जिल्हाधिकारी करणार, तर मामा होणार पोलीस अधीक्षक | पुढारी

असा एक लग्नसोहळा : कन्यादान जिल्हाधिकारी करणार, तर मामा होणार पोलीस अधीक्षक

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : येथील सहकार विद्यामंदिरच्या सांस्कृतिक सभागृहात ५ जुलैच्या सायंकाळी एका अनाथ व मूकबधिर तरूणीचा लग्न सोहळा एका मूकबधिर तरूणासोबत थाटामाटात साजरा होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती व राजेश्वरी राममूर्ती हे दाम्पत्य कन्यादान करणार आहेत. तर वधूचे मामा म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया हे पाठिशी उभे असतील.

वझर (जि. अमरावती) येथील प्रसिद्ध सेवाव्रती शंकरबाबा पापळकर यांची २५ वी मानसकन्या दीपाली हिचा विवाह बुलडाणा येथील आशिष जांगीड या मूकबधिर तरूणासोबत होणार आहे. हा सोहळा भव्यतेने व थाटामाटात साजरा करण्याची संपूर्ण जबाबदारी बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेशाम चांडक यांनी स्वीकारली आहे. आणि सामाजिक दायित्वाचे भावनेने एका अनाथ तरूणीच्या लग्नासाठी मोठी संवेदनशीलता दाखवत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात लग्नपत्रिका वितरित करून लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.

अनाथांचे संसार उभा करणारा अवलिया म्हणून शंकरबाबा पापळकर यांची पश्चिम विदर्भात ख्याती आहे. मुलगी म्हणजे लग्नाच्या खर्चाचे ओझे अशा चुकीच्या समजूतीने काही लोक मुलीला जन्मत:च कच-याच्या पेटीत टाकून पळ काढतात. मुले- मुली दिव्यांग जन्माला आली, तर त्यांना निष्ठूरतेने वा-यावर सोडणारे अनेकजण आढळतात. अशावेळी दिव्यांग व बेवारस जीवांचा आधार म्हणून शंकरबाबा धावून जातात आणि मायेने त्यांचा सांभाळ करतात. रस्त्यावर, उकीरड्यावर सापडलेली अनेक अनाथ, गतिमंद, दिव्यांग कर्णबधीर, मूकबधिर मुले- मुली वझर येथील आश्रमाच्या बालगृहात आहेत.

आजपर्यत १३० निराधार मुलांचे कायम पुनर्वसन केले असून आता पर्यत आश्रमात सांभाळ केलेल्या २४ अनाथ मुलींचे लोकांच्या मदतीने लग्न लावून दिली आहेत. मंगळवार ५ जुलै बुलडाण्यात २५ वी मानसकन्या दिपालीचा विवाह सोहळा होणार असल्याने शंकरबाबा आनंदात आहेत. हा विवाह सोहळा दाक्षिणात्य व राजस्थानी पध्दतीने केला जाणार आहे. तर वैदिक पध्दतीने मंगलाष्टके होतील. वधूचा हळदी समारंभ जिल्हाधिका-यांच्या पत्नी राजेश्वरी एस. राममुर्ती करणार आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button