यवतमाळ : मुलाला घेण्यासाठी सासरी आलेल्या पत्नीचा खून | पुढारी

यवतमाळ : मुलाला घेण्यासाठी सासरी आलेल्या पत्नीचा खून

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : पतीकडे असलेल्या मुलाला घेऊन जाण्यासाठी आलेल्या पत्नीचा पतीने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे. मुलाला घेण्यासाठी पत्नी व सासू मंगळवारी (दि.२८) कोलुरा येथे आली होती. यावरून पती-पत्नीत वाद झाला. संतापलेल्या पतीने पत्नीला डांबून लोखंडी गजाने मारहाण केली. ती मारहाणीत गंभीर जखमी  झाल्यानंतर घराबाहेर फरफटत काढले यातच पत्नीचा मृत्यू झाला. शुभांगी विजय जांभोरे (२७, रा. अमरावती) असे मृत महिलेचे नाव आहे.

शुभांगीचा कोलुरा येथील विजय दामोधर जांभोरे (४०) याच्याशी विवाह झाला होता. हे दोघेही पती-पत्नी अमरावती येथे राहात होते. मात्र, विजय मजुरीचे पैसे घरी देत नव्हता. यावरून नवरा-बायकोत वाद झाला. त्यानंतर, विजय हा कोलुरा येथे त्याच्या आईसोबत रहात होता.

क्षुल्लक कारणावरून नेहमी होत असलेल्या वादामुळे पत्नी माहेरी गेली. तिने सोबत सात वर्षांच्या मुलाला नेले. मात्र, काही दिवसांतच विजय मुलाला घेऊन आपल्या गावी कोलुरा येथे परत आला. काही दिवसांपूर्वी विजयच्या आईने सात वर्षीय नातवाला कोलुरा येथे आणले होते. त्याला घेण्यासाठी शुभांगी, तिची आई जयश्री सुखदेवे यांना घेऊन मंगळवारी दुपारी कोलुरा येथे आली होती.

मुलाची बॅग भरत असतानाच, विजय घरी पोहोचला. त्याने पत्नी शुभांगीशी वाद घालत तिच्यावर लोखंडी गजाने हल्ला चढविला, नंतर रक्तबंबाळ अवस्थेत फरफटत शुभांगीला घराबाहेर काढले. हा सर्व प्रकार शुभांगीची आई जयश्री पाहत होती. तिने विजयच्या तावडीतून शुभांगीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, विजय चवताळून जयश्रीच्या मागे धावू लागला. जिवाच्या आकांताने शुभांगीची आई जयश्री आरडाओरडा करत पळू लागली. शुभांगीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच, विजय भानावर आला व त्याने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी नेर पोलिसांनी जयश्री सुखदेवे यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. नेर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.

हेही वाचा

Back to top button