चंद्रपूर : अग्निपथ योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन | पुढारी

चंद्रपूर : अग्निपथ योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसने चंद्रपूर येथे तीव्र आंदोलन करून निषेध व्यक्त केला. २ वर्षापासून सैन्य भरती रखडल्यामुळे सराव करणाऱ्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर निराशा आहे. त्यातच केंद्र सरकारने अग्निपथ योजना आणून बेरोगारांची थट्टा चालविली आहे, अशी टीका यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केली.

२०१४ च्या निवडणुकांवेळी मोदी सरकारने दरवर्षी २ करोड रोजगार देण्याचे जाहीर केले होते, परंतु २ कोटी सोडून २ लाख ही तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी १ वर्षात १० लाख रोजगार देणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले होते. अशा धूळफेक करणाऱ्या घोषणा करून एकप्रकारे बेरोजगारांची थट्टा चालविण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे, असेही ते म्हणाले.

अग्निपथ या योजनेत ४ वर्षांच्या सेवा कालावधीनंतर शाश्वत रोजगार मिळणार असल्याचे ठोस आश्वासन केंद्र सरकारने दिलेले नाही. त्यामुळे ४ वर्षांनंतर बेरोजगारीच्या विळख्यात तरुणाई पुन्हा एकदा अडकेल, अशी भीतीही भटारकर यांनी व्यक्त केली.
सैन्य भरतीसाठी इच्छुक असलेल्या युवकांवर, तसेच सैन्याच्या मनोबलावर या योजनेचा होणारा विपरीत परिणाम लक्षात घेत केंद्र सरकारने सदर योजना मागे घ्यावी, अशी मागणी भटारकर यांनी यावेळी केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजीव कक्कड, अभिनव देशपांडे, सुनील काळे, माजी सरपंच अमोल ठाकरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, शहर अध्यक्ष कोमील मडावी आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button