बुलडाणा : संशयित दहशतवादी जुनैदमुळे गोंधनापूर गावाला धक्का | पुढारी

बुलडाणा : संशयित दहशतवादी जुनैदमुळे गोंधनापूर गावाला धक्का

बुलडाणा, पुढारी वृत्तसेवा : लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एटीएसने पुण्यातील दापोडी भागातून अटक केलेला जुनैद मोहम्मद अता मोहम्मद (वय २५) हा मूळचा गोंधनापूर(ता. खामगाव) येथील रहिवासी आहे. एटीएसच्या कारवाईनंतर जुनैदची कृत्ये उघडकीस आल्यामुळे गोंधनापूरच्या ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. खामगाव शहरापासून ८ कि.मी. वर बुलडाणा मार्गावर गोंधनापूर हे पाच हजार लोकसंख्येचे गाव आहे.

येथील जुनैद मोहम्मद हा सातवी पर्यंत गावातील उर्दू शाळेत तर दहावी पर्यंत खामगावात शिकला. पाच वर्षापूर्वी पुण्याला गेल्यानंतर दापोडी भागातील एका मदरशात त्याने शिक्षण घेतले. या मदरशाजवळच सावत्र बहिणीकडे भाड्याच्या घरात राहून जुनैद हा भंगारचा व्यवसाय करू लागला. जुनैद हा फेसबुकच्या माध्यमातून लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे.

तरूणांना भडकावून देशविरोधी कारवायात सहभागी करवून घेणा-या लष्कर-ए-तोयबा संघटनेत आपल्या गावातील एक तरूण सामिल असल्याचे समोर आल्यानंतर गोंधनापूर गावात खळबळ उडाली. एटीएसने अटक केलेल्या जुनैदबाबत बोलायला कुणीही समोर आलेले नाही. एवढा ग्रामस्थांना धक्का बसला आहे. पुण्याला रहायला गेलेला जुनैद हा दरवर्षी ईदसाठी गावी यायचा. परंतू यंदाच्या रमजान ईदला तो गावाकडे आला नाही.

जुनैदची कौटुंबिक पार्श्वभूमी

जुनैदचे वडिल सध्या मोहम्मद हे गावात मजूरी करून व किरकोळ वस्तूंची विक्री करून कुटूंबाचा निर्वाह करतात. त्यांना पहिली पत्नी मदिना पासून जुनैद व शोएब ही मुले झाली. यातील शोएब हा गतिमंद आहे. आजारपणात मदिनाचा मृत्यू झाल्यामुळे मोहम्मद यांनी दुसरा विवाह केला. त्यांना दुसऱ्या पत्नीपासून शाहिनाबी ही मुलगी झाली. पुणे येथे याच सावत्र बहिणीकडे राहून जुनैद हा मदरशात शिकला.
सद्या जुनैद पोलीस कोठडीत आहे.

उत्तर प्रदेशातील सहान जिल्ह्यातील दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणातील मुख्य आरोपीशी जुनैदचा संपर्क असल्याचे उघडकीस आल्यानंतर यु.पी. एटीएसचे पथक जुनैद मोहम्मदला पकडण्यासाठी १९ मे रोजी गोंधनापूर येथे त्याचे घरी धडकले होते.परंतू तो गावी रहात नसल्याने पथक परत गेले होते. त्यापाठोपाठ एटीएसने दापोडी भागातून जुनैदला अटक केली आहे.यामुळे त्याचे मूळ गाव गोंधनापूरही चर्चेत आले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button