चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे अतिक्रमीतांची घरे पाडू नका : आ. मुनगंटीवार | पुढारी

चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे अतिक्रमीतांची घरे पाडू नका : आ. मुनगंटीवार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे जागेवर अतिक्रमण करुन राहिलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह, माजरी व चंद्रपूर येथील हजारो कुटुंबांना रेल्वे प्रशासनाने अतिक्रमित जागा खाली करण्याबाबत नोटीस बजावली. या गरीब कुटुंबाच्या मदतीस धावत येत माजी मंत्री आमदार मुनगंटीवार यांनी गुरूवारी (दि.12) जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आणि रेल्वे विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेऊन अतिक्रमण धारकांची घरे न पाडण्याचे निर्देश दिले.

अनेक वर्षांपासून रेल्वे विभागाच्या जागांवर अतिक्रमण करून हजारो कुटुंब वास्तव्य करीत आहेत. या अतिक्रमणधारकांना रेल्वे प्रशासनाने अतिक्रमीत जागा खाली करण्याबाबत नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. घरे खाली करण्यासाठी रेल्वे प्रशासन दबाब आणत असल्याने हजारो कुटुंबांनी सुधीर मुनगंटीवार यांना साकडे घातले आहे. हजारो कुटुंबियांचे निवारे वाचविण्यासाठी आमदार मुनगंटीवार धावून आले. त्यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आणि रेल्वे विभागांच्या अधिकाऱ्यांना अतिक्रमण धारकांची घरे पाडू नका तर त्यांच्याकरीता पर्याय व्यवस्था निर्माण करण्याच्या सुचना दिल्या.

चंद्रपूर जिलह्यामध्ये बल्लारशाह, माजरी व चंदपूर येथील रेल्वेच्या जागांवर हजारो कुटूंबांनी अतिक्रमण करून आपला प्रपंच थाटला आहे. अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी वास्तव्यास आहेत. नुकतचे रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण धारकांना जागा खाली करण्याबाबत नोटीस बजावली आहे. रेल्वे प्रशासन घरे खाली करण्याबाबत दबाब आणत असल्याने आपले निवारे वाचविण्यासाठी अतिक्रमण धारक लोकप्रतिनिधींना साकडे घालत आहेत. लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांना अतिक्रमणधारकांनी निवारे वाचविण्यासाठी साकडे घातले आहे. याप्रकरणी त्यांनी लक्ष घालत बैठकीत अतिक्रमण धारकांची निवासाची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत एकाही कुटूंबियांचे घरे किंवा जागा रिकामे करू नका असे निर्देश जिल्हाधिकारी तथा रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीला रेल्वे विभागाचे अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी, तहसीलदार, निवासी उपजिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी, रेल्वे विभागाला त्यांच्या असणाऱ्या जमिनी संदर्भातील सर्व कागदपत्रे तातडीने सादर करण्यास सांगितले आहे. तो पर्यंत कोणत्याही रेल्वेच्या जमिनीवरून अतिक्रमण धारकांना हटवू नये, अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

Back to top button