राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज आश्रमातही भोंग्याविना सामुदायिक ध्यान | पुढारी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज आश्रमातही भोंग्याविना सामुदायिक ध्यान

अमरावती : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज येथील आश्रमात प्रथमच सामुदायिक ध्यान भोंग्याविना झाले. लाऊडस्पीकरवर होणाऱ्या सामुदायिक ध्यानाची ८० वर्षांची परंपरा प्रथमच खंडीत झाली आहे. गुरूकुंज आश्रमात आता पहाटे ५.३० वाजता लाऊड स्पीकरवर सामुदायिक ध्यान ऐकू येणार नाही. सामुदायिक प्रार्थना निश्चित डेसीबलमध्ये लाऊड स्पीकरवर नियमित सुरू राहणार आहे. ८० वर्षांच्या परंपरेला खंड पडल्याने गुरूदेव भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

धार्मिक स्थळांवर लाऊड स्पीकरच्या आवाजाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशावर अंमल सुरू झाल्याने गुरुकुंज आश्रमातील भोंग्यावर त्याचा परिणाम झाला आहे. शुक्रवारी सामुदायिक प्रार्थना नित्यनेमाने झाली. मात्र, पहाटेचे ध्यान करताना भोंग्याचा वापर टाळण्यात आला. ८० वर्षांत प्रथमच गुरूकुंजात नागरिकांना पहाटे ध्यानाचे स्वर कानी पडले नाही. त्यामुळे अनेकांना धक्का बसला.

अखिल विश्वाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरीमधील आश्रम ८० वर्षापासून भोंग्यावर ध्यान म्हणण्याची परंपरा आहे. सकाळी सामुदायिक ध्यानाअगोदर तुकडोजी महाराजांच्या आवाजातील भजने व अभंगाच्या माध्यमातून परिसरात प्रसन्नता निर्माण केली जाते. त्यामुळे पंचक्रोशीमधील अनेक लोकांची पहाट सामुदायिक ध्यानाने होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आधी मस्जिद आणि नंतर मांदिरावरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. न्यायालयाने आदेश दिल्याने राज्यातील अनेक महत्वाच्या मंदिरातील आरत्या या भोंग्याविना पार पडत आहेत. अशातच सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रममधील महाद्वारावर असलेल्या भोंग्याची परंपरा इतिहासात पहिल्यांदा खंडित झाली आहे.

राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर प्रशासनाने भोंग्यांवर काही निर्बंध लादले आहेत. त्यामुळे तुकडोजी महाराजांच्या आश्रमातील भोंगा आता बंद झाला आहे. सकाळचे सामुदायिक ध्यान भोंग्याविना पार पडल्याने परिसरात सकाळी शांतता झाली होती. दिवसाची सुरुवात महाराजांच्या आश्रमातील सामुदायिक ध्यानाने करतो, अशी प्रतिक्रिया अनेक गुरुदेव भक्तांनी दिली. त्यामुळे कुठलीही अट न ठेवता तुकडोजी महाराजांच्या आश्रमातील भोंगे चालू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करीत पहाटे होणारे सामुदायिक ध्यान लाऊड स्पीकरविना पार पडले. आश्रमात आतमध्ये सामुदायिक ध्यान झाले. मात्र, आश्रमाच्या मुख्य द्वारावर असलेले लाऊड स्पीकर बंद करण्यात आले.

  • डॉ. राजाभाऊ बोथे, अधात्म विभाग प्रमुख, गुरूकुंज आश्रम

हेही वाचलंत का ? 

Back to top button