अमरावती : शेतीच्या वाटणीवरून डोक्यात दगड घालून सावत्र आईचा खून | पुढारी

अमरावती : शेतीच्या वाटणीवरून डोक्यात दगड घालून सावत्र आईचा खून

अमरावती : पुढारी वृत्तसेवा : शेतीच्या हिस्से वाटणीच्या वादातून मुलाने सावत्र आईचा डोक्यात दगड घालून खून केला. सुमन विश्वेलाल भोसले ( वय ३२, रा. पारधी बेळा, जगतपूर) असे खून झालेल्या आईचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि.४) सकाळी १० च्या सुमारास मंगरुळ चव्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगतपूर स्थित पारधी बेळ्यावर घडली. या प्रकरणातील आरोपी मारोतराव विश्वेलाल भोसले ( वय ३०, रा. पारधी बेळा, जगतपूर) हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

या प्रकरणी हसन बसन भोसले ( वय ४५, रा. पारधी बेळा, जगतपूर) याने मंगरुळ चव्हाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मारोतराव भोसलेविरुध्द खूनाचा गुन्हा नोंदविला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सुमन भोसले ही आरोपी मारोतराव भोसलेची सावत्र आई आहे. मारोतराव नेहमी शेतीच्या हिस्से वाटणीवरून सावत्र आई सुमन व वडिलांशी वाद घालत होता. बुधवारी सकाळी हसन भोसले व सुमन भोसले हे दोघेही घराच्या अंगणातील चिंचेच्या झाडाखाली बसले होते. यावेळी तेथे आलेल्या मारोतराव याने सुमन यांच्याशी शेतीच्या हिस्से वाटणीवरून वाद घातला. त्यानंतर मारोतरावने सुमन यांच्या डोक्यावर दगड मारला. दगड सुमन यांच्या कपाळावरील डाव्या डोळ्याच्या भुवईच्यावर लागल्याने रक्तस्त्राव सुरु झाला. दरम्यान, रक्तस्त्राव वाढल्याने सुमन यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button