अमरावती : युवा स्वाभिमानचा शिवसेना कार्यालयावर हल्ला; ५ जणांना अटक | पुढारी

अमरावती : युवा स्वाभिमानचा शिवसेना कार्यालयावर हल्ला; ५ जणांना अटक

अमरावती : पुढारी वृत्तसेवा : आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना जामीन मिळाल्यानंतर  बुधवारी रात्री ९ च्या सुमारास ‘युवा स्वाभिमान’च्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी राजापेठ स्थित शिवसेनेच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करत हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी शिवसेना कार्यालयात घुसून खुर्च्यांची फेकफाक केल्याने खळबळ उडाली होती.

याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी ‘युवा स्वाभिमान’च्या चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे. आरोपींमध्ये युवा स्वाभिमान पार्टीचे अभिजित देशमुख, अनुप अग्रवाल, मंगेश कोकाटे, अनिकेत देशमुख व सत्यम राऊत यांचा समावेश आहे. राजापेठ पोलिसांनी अभिजित, अनुप, मंगेस व अनिकेत या चौघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करण्यासाठी गेलेले आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केली होती. नुकतीच राणा दांपत्यांचा जामीन मंजूर झाल्यामुळे युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी शहरात जल्लोष केला. दरम्यान युवा स्वाभिमानने राजापेठ स्थित शिवसेना कार्यालयासमोर जल्लोष करीत आतषबाजी केली.

दरम्यान, काही युवा स्वाभिमानचे पदाधिकारी शिवसेनेच्या कार्यालयात शिरले आणि त्यांनी कार्यालयातील खुर्च्यांची फेकाफेक केली. हा प्रकार पाहून पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन युवा स्वाभिमानच्या चार जणांना ताब्यात घेतले, तर गुरुवारी पोलिसांनी राऊत नामक एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. तर युवा स्वाभिमानचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेना कार्यालयात शिरल्यानंतर तेथे उपस्थित एका तरुणाला त्यांनी मारहाण केली. तो तरुण तेथे राहून शिक्षण घेऊन काम करीत होता.

दारू पिऊन होते आरोपी

शिवसेना कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणात राजापेठ पोलिसांनी युवा स्वाभिमान पार्टीचे अभिजित देशमुख, अनुप अग्रवाल, मंगेश कोकाटे अनिकेत देशमुख, सुरज मिश्रा व अन्य तीन ते चार जणांविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींची इर्विन रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे हे कार्यकर्ते दारू पिऊन असल्याचे स्पष्ट झाले.

युवा स्वाभिमानचे काही कार्यकर्त्यांनी राजापेठ स्थित शिवसेना कार्यालयात शिरून एका गरिब तरुणाला मारहाण केली. त्यानंतर कार्यालयातील खुर्च्यांची फेकाफाक केली. पाच जणांना अटक करण्यात आली असून, आरोपींची वैद्यकीय तपासणी केली असता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, ते दारू पिलेले असल्याचे आढळून आले आहे.
मनिष ठाकरे, ठाणेदार, राजापेठ पोलीस ठाणे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button